रेल्वेतून बिनबोभाट कोट्यवधींची सोने तस्करी, सुरक्षेत निष्काळजीपणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 08:10 AM2022-11-29T08:10:23+5:302022-11-29T08:11:02+5:30
कमकुवत सुरक्षेचा तस्कर उचलतात फायदा
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाहिजे तशी कडक तपासणी होत नसल्याने, रेल्वेतून नियमित कोट्यवधी रुपयांची सोने तस्करी केली जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. चुकून एखादवेळी सोने चोरीला गेले किंवा कुणी पळविले, तर तेवढ्या काही दिवसांसाठी रेल्वेतून सोन्याची बिनबोभाट वाहतूक केली जात असल्याचा मुद्दा अधोरेखित होतो आणि नंतर पुन्हा जैसे थे सर्व सुरू होते.
विमानतळांवर सुरक्षेच्या कडक उपाययोजना असल्यामुळे आणि सामानाची सूक्ष्म तपासणी होत असल्याने, हवाईमार्गे सोने तस्करी करण्याला बऱ्यापैकी आळा बसला आहे. लांब अंतरावर खासगी वाहनाने तस्करी करण्याचेही धोके असतात. जागोजागी पोलिसांची नाकेबंदी असते. त्यामुळे तस्करीसाठी रेल्वेगाडी सर्वात चांगली आणि सुविधाजनक वाटते. धावत्या रेल्वेत प्रवाशांची बॅग तपासली जात नाही. रेल्वेस्थानकावरही सूक्ष्म तपासणी होत नाही. त्यामुळे रेल्वेतून नियमित कोट्यवधींच्या सोन्याची बिनबोभाट तस्करी केली जाते. विशेष म्हणजे, या तस्करांवर प्रतिस्पर्धी टोळीची नजर असते. त्यामुळे टीप देऊन मध्येच सोने उडविले जाते. अशा वेळी प्रवासादरम्यान सोने चोरीला गेल्याची तक्रार दिली जाते. त्यामुळे काही दिवसांसाठी सोने तस्करीचा मुद्दा चर्चेला येतो, नंतर परत पूर्ववत होते.
पंजाब, दिल्ली, हावडा ते साबरमती नेटवर्क
nसोने तस्करीचे नेटवर्क पंजाब, दिल्ली आणि हावडा येथून चालते. अमृतसर, लुधियानामधूनही नियमित मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी केली जाते.
nपंजाब, दिल्लीतून रेल्वेमार्गे भोपाळ, ईटारसी आणि इकडे नागपुरात सोने आणले जाते. या दोन्ही मार्गांवरून नंतर ते गुजरातसह विविध प्रांतात पोहोचते, अशी खास सूत्रांची माहिती आहे. जळगांवमध्ये तस्करीचे मोठे नेटवर्क आहे.