अंदमान एक्स्प्रेसमधून विदेशी दारूची तस्करी; आरपीएफ, सीआयबीची कारवाई
By नरेश डोंगरे | Published: November 19, 2024 08:22 PM2024-11-19T20:22:43+5:302024-11-19T20:23:33+5:30
दारूच्या २८ बाटल्या जप्त : दोन संशयित ताब्यात
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि केंद्रीय खुपिया विभागाने (सीआयबी) अंदमान एक्स्प्रेसमधून केली जाणारी दारूची तस्करी उजेडात आणली. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून विदेशी दारूच्या २८ बाटल्या जप्त करण्यात आल्या.
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यामुळे मतदारांना वेगवेगळ्या पद्धतीने आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सोमवारी गाडी क्रमांक १६०३२ अंदमान एक्स्प्रेस ३.१८ वाजता नागपूर स्थानकावर आली असता आरपीएफ आणि सीआयबीने गाडीच्या मागच्या बाजूला असलेल्या जनरल डब्यात तपासणी केली असता त्यांना एका सीटखाली चार जाडजूड बॅगा दिसल्या. त्यांची तपासणी केली असता त्यात ७५० मिलीच्या २८ विदेशी दारूच्या बाटल्या आढळल्या. दारूच्या बाटल्यांनी भरलेल्या या बॅग कुणाच्या आहेत, अशी विचारणा केली असता त्या सीटवर बसलेले दोन संशयित काही बोलायला तयार नव्हते. त्यामुळे संशयावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
प्राथमिक तपासावरून महाराष्ट्र दारू प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर संशयित आरोपी आणि जप्त करण्यात आलेला मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सोपविण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.
‘लोकमत’च्या वृत्तानंतर कारवाईचा धडाका
रेल्वेतून रोकड, दागिने तसेच अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ४ नोव्हेंबरला ठळकपणे प्रकाशित करून या गैरप्रकाराचा भंडाफोड केला होता. तेव्हापासून रेल्वे सुरक्षा दल, खुपिया विभाग आणि रेल्वे पोलिस अलर्ट मोडवर आले. त्यांनी ‘ऑपरेशन सतर्क’ राबविणे सुरू केले आहे. त्यानंतर गेल्या दोन आठवड्यांत चार लाखांची रोकड, लाखोंचा गांजा आणि दारू जप्त करण्याच्या मोठ्या कारवाया आरपीएफकडून करण्यात आल्या.