रेल्वेतून सोने, चांदी, हिरे आणखी कशा-कशाची तस्करी? १५ दिवसांत दोन मोठ्या खेप पकडल्या
By नरेश डोंगरे | Published: November 3, 2023 07:12 PM2023-11-03T19:12:21+5:302023-11-03T19:12:42+5:30
रेल्वे सुरक्षा दलासह वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी अवघ्या १५ दिवसांत सोने आणि चांदीच्या दोन मोठ्या डिल पकडून तस्करीचा भंडाफोड केल्याने रेल्वे पोलीस, सुरक्षा दलासह साऱ्याच तपास यंत्रणांचे नेत्र विस्फारले आहे.
नागपूर : देशभरातील तस्करांनी सोने, चांदी, हिरे आणि अशाच माैल्यवान चिजवस्तूंची रेल्वेतून धडाक्यात तस्करी चालविली आहे. विविध रेल्वेगाड्यांमधून तस्करांचे हस्तक बेमालुमपणे कोट्यवधींचा माल ईकडून तिकडे करीत आहेत. रेल्वे सुरक्षा दलासह वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी अवघ्या १५ दिवसांत सोने आणि चांदीच्या दोन मोठ्या डिल पकडून तस्करीचा भंडाफोड केल्याने रेल्वे पोलीस, सुरक्षा दलासह साऱ्याच तपास यंत्रणांचे नेत्र विस्फारले आहे.
देशात आधी सोने-चांदीची तस्करी सागरी मार्गाने केली जायची. मोठमोठ्या खेप वेगवेगळ्या बंदरावर पोहचायच्या. मात्र, सागरी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्याने तस्करांचे डाव उधळले गेले. कोट्यवधींचा माल पकडला जाऊ लागल्याने विदेशात धागेदोरे असलेल्या तस्करांनी हवाई मार्ग निवडला. मात्र, वेगवेगळ्या विमानतळावर सोने तस्कर जेरबंद होऊ लागल्याने तस्करांनी आता सोने-चांदीची तस्करी करण्यासाठी रेल्वेची निवड केली आहे. बांगलादेशातून कोलकाता मार्गे उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात आणली जाणारी अशीच एक सोन्याची खेप डीआरआयने आरपीएफच्या मदतीने पकडली. या प्रकरणात ११ जणांना अटक करून त्यांच्याकडून तब्बल ३२ किलो सोने जप्त करण्यात आले.
विशेष म्हणजे, या गोल्ड स्मगलिंगची चाैकशी सुरूच असताना रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी गोंदियाजवळ शालीमार एक्सप्रेसमध्ये तस्करीची ५० किलो चांदी पकडून पुन्हा चांदी तस्करीचा भंडाफोड केला. अशा प्रकारे १५ दिवसांपूर्वी रेल्वेगाडीतून तस्करी करून आणलेले सोने आणि आता चांदी आणि तत्पूर्वी दुर्मिळ कासवं जप्त करण्यात आल्याने 'रेल्वे गाड्या आणि तस्करी'चा मुद्दा जोरदार चर्चेला आला आहे. केवळ, सोने चांदीच नव्हे तर हिरे आणि अन्य माैल्यवान चिजवस्तूंचीही रेल्वेतून नियमित तस्करी केली जात असल्याची जोरदार चर्चा ऐकायला येत आहे.
छत्तीसगड-मध्य प्रदेशची दारू, ओडिशाचा गांजा अन् मुंबईची एमडी
रेल्वे गाड्यातून दारू, गांजा, एमडी अशा अंमली पदार्थांची तस्करी जवळपास रोजच होते. छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात नकली ब्रॅण्डेड दारू तयार केली जाते. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात या दारूची रेल्वेने तस्करी केली जाते.
ओडिशातील मलकनगिरी, संभलपूर येथून कोलकाता मार्गाने रेल्वेने गांजा आणला जातो आणि ती खेप महाराष्ट्र, मध्यप्रदेश, दिल्लीत पाठविली जाते. तर, सर्वात जहाल आणि महागडे समजले जाणारे मेफॅड्रोन (एमडी) हे अंमली पावडर मुंबईतून रेल्वेने ईटारसी मार्गे मध्यप्रदेश, दिल्ली, नोएडात पाठविले जाते तर अमरावती, नागपूर मार्गे महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्रासह अन्य राज्यात पोहचवले जाते.
कोट्यवधींच्या रकमेचीही हेराफेरी
सोन्या-चांदीसह माैल्यवान चिजवस्तू आणि वेगवेगळे अंमली पदार्थच नव्हे तर रेल्वे गाड्यातून कोट्यवधीच्या रकमेचीही हेरफेर केली जाते. वेगवेगळ्या बॉक्समध्ये, पिंप, डब्यातून हवालाची रोकडही नागपूर मार्गे दूरदूरवर पाठविली जाते. ही हेरफेर एवढ्या सराईतपणे केली जाते की शंभरातून एखादवेळीच त्याचा तपास यंत्रणांना सुगावा लागतो आणि ती पकडली जाते.