कारमधून ‘एमडी’ची तस्करी, १०.६९ लाखांचे ड्रग्ज जप्त
By योगेश पांडे | Published: May 12, 2024 03:33 PM2024-05-12T15:33:17+5:302024-05-12T15:33:43+5:30
आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याने पंकज साठवणे याच्या मदतीने एमडी पावडर घेतल्याची कबुली दिली.
नागपूर : कारमधून एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. त्याच्याकडून साडेदहा लाखांहून अधिक किंमतीची पावडर जप्त करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनच्या पथकाने अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली.
शनिवारी रात्रीच्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना ठवरे हायस्कूलजवळील चिमणी चौकात एका कारमधून एमडी पावडरची तस्करी होणार असल्याची माहिती खबऱ्यांच्या माध्यमातून मिळाली. पोलिसांनी सापळा रचून सोनू उर्फ भिमा राजेश उगरेजा (२१, चंद्रनगर, अजनी) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ १०६.९१ ग्रॅम एमडी पावडर आढळली. त्या पावडरची किमत १०.६९ लाख इतकी आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एमडी पावड, कार, दोन मोबाईल फोन असा १६.४४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याने पंकज साठवणे याच्या मदतीने एमडी पावडर घेतल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपींविरोधात अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सोनूला अटक झाली आहे. पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, गजानन चांभारे, राजेश तिवारी, महेन्द्र सडमाके, शैलेश जांभुळकर, दिपक चोले, अर्जुन यादव, दिनेश डवरे, संदीप चंगोले, सुनिल कुवर, संदीप पांडे व प्रविण चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.