रेल्वेतील कोच अटेंडन्टच्या माध्यमातून एमडीची तस्करी
By योगेश पांडे | Published: March 10, 2024 11:19 PM2024-03-10T23:19:17+5:302024-03-10T23:19:33+5:30
२४ लाखांच्या जप्तीनंतर तस्करीची नवीन तऱ्हा उघड.
नागपूर : एमडीच्या तस्करीसाठी रस्तेमार्गाचा वापर करणाऱ्या तस्करांनी आता रेल्वेतील कोच अटेंडन्टचा उपयोग करणे सुरू केले आहे. शनिवारी गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने २४ लाखांच्या एमडी जप्त केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील मुख्य तस्कर अद्यापही फरार आहेत.
शहरात तीन आरोपींकडे मोठ्या प्रमाणावर एमडी पावडर असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाला मिळाली. पोलिसांनी आतिश लक्ष्मण बागडे (२८, अजनी रेल्वे कॉलनी, आरबी १/३२६), गौरव उर्फ सागर शेषराव कटारे (२५, टिमकी तीनखंबा चौक, तहसील) यांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळून २४१ ग्रॅम ५ मिली एमडी आढळली. त्या पावडरची किंमत २४.१५ लाख इतकी आहे. पोलिसांनी या आरोपींकडून दोन मोबाइल फोन, मोटारसायकल, मोपेड, लोखंडी कुकरी असा २५.८६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या रॅकेटचा सूत्रधार विशाल विजय मेश्राम, त्याचा भाऊ विक्रांत मेश्राम, साथीदार शुभम खापेकर आणि यश माथाणीकर हे फरार आहेत. विशाल मेश्राम आणि त्याचा भाऊ विक्रांत हे या रॅकेटचे सूत्रधार आहेत. ते बऱ्याच दिवसांपासून अंमली पदार्थांची तस्करी करत होते. विशालवर अमली पदार्थ विक्रीसह ३० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
पूर्वी मेश्राम बंधू मुंबईतून एमडीची खेप स्वत: किंवा त्यांच्या पंटर्सच्या माध्यमातून आणायचे. मात्र पोलिसांपासून वाचण्यासाठी एमडी तस्करांनी डावपेच बदलले असून, मुंबई मार्गावरील ट्रेनच्या कोच अटेंडंटच्या मदतीने ते एमडीची खेप मागवत आहेत. मेश्राम बंधूंनी मित्रामार्फत आतिश बागडे याच्याशी संपर्क साधला. त्याला मुंबईहून पावडरचे पार्सल आणण्यास सांगितले. एमडीचे पार्सल घेऊन आतिश शनिवारी सकाळी नागपूरला पोहोचला. ड्युटी संपल्यानंतर तो पार्सल घेऊन रेल्वे क्वार्टरमध्ये आला. एनडीपीएसच्या पथकाला याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून आतिश आणि गौरवला अटक केली. मेश्राम बंधू आणि त्यांचे दोन साथीदार फरार झाले. आतिश पहिल्यांदाच एमडीची खेप आणल्याबद्दल सांगत आहे. मेश्राम बंधू पकडल्यानंतरच रॅकेटचे सत्य समोर येईल.
एका पार्सलचे पाच हजार
पार्सल पोहोचवण्याच्या बदल्यात पाच हजार रुपये मिळणार होते, असे आतिशने पोलिसांना सांगितले. पार्सलमध्ये एमडीच्या अस्तित्वाची त्याला कल्पना नव्हती. आतिशचा भाऊ रेल्वेत काम करतो. तो भावाच्या क्वॉर्टरमध्ये राहतो. या कारवाईमुळे रेल्वे पोलिसांमध्येही खळबळ उडाली आहे.