महिलेला दंश करणारा साप सात दिवस घरातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:07 AM2021-06-06T04:07:46+5:302021-06-06T04:07:46+5:30
रामटेक : रामटेकजवळील नेरला येथील जनाबाई रामाजी मोहुरले (५३) यांना २९ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ब्राऊन कोब्रा ...
रामटेक : रामटेकजवळील नेरला येथील जनाबाई रामाजी मोहुरले (५३) यांना २९ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ब्राऊन कोब्रा सापाने दंश केला. सरपणासाठी लागणाऱ्या काड्यांचा ढीग रचत असताना या महिलेच्या हाताच्या बोटाला सापाने दंश केला. दवाखान्यात नेताना या महिलेचा मृत्यू झाला. मात्र साप मातीच्या घरात असलेल्या बिळात लपून बसला. या ठिकाणी सात बिळे होती. त्यामुळे साप नेमक्या कोणत्या बिळात गेला याचा अंदाज सर्पमित्रांना येत नव्हता, पण सर्पमित्र मंगेश भिवगडे व शेजाऱ्यांनी पाळत ठेवली. शेवटी ४ जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास हा साप आढळला. लागलीच याची माहिती रामटेक येथील सर्पमित्र अजय मेहरकुळे, राहुल कोठेकर, राहुल विश्वकर्मा, राहुल खरकाटे यांना देण्यात आली. सर्पमित्रांनी या सापाला पकडून वनपरिक्षेत्र अधिकारी अगडे यांच्या स्वाधीन केले. घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवून मातीचे खड्डे, बीळ बुजविण्याविषयी वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनच्या सर्पमित्रांनी ग्रामस्थांना आवाहन केले.