सर्पदंश झालेल्या रुग्णांकडून सर्पमित्र मागताहेत पैसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:08 AM2021-07-17T04:08:37+5:302021-07-17T04:08:37+5:30
नागपूर : सर्पदंश झाल्यानंतर रुग्णालयात भरती रुग्णाच्या नातेवाईकांकडून काही सर्पमित्राद्वारे तपास करण्याच्या नावाने शुल्क म्हणून पैशांची मागणी करीत आहेत. ...
नागपूर : सर्पदंश झाल्यानंतर रुग्णालयात भरती रुग्णाच्या नातेवाईकांकडून काही सर्पमित्राद्वारे तपास करण्याच्या नावाने शुल्क म्हणून पैशांची मागणी करीत आहेत. गुरुवारी सायंकाळी असेच एक प्रकरण समाेर आले आहे. मेयाेमध्ये भरती संबंधित रुग्णाच्या नातेवाईकासाेबत झालेल्या संवादाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली. लाेकमतने चाैकशी केली असता माहिती सत्य असल्याचे समाेर आले आहे.
बुधवारी कळमना परिसरातील एका चिमुकलीला सापाने दंश केला हाेता. तिला मेयाे रुग्णालयात आणण्यात आले आहे. यादरम्यान या कथित सर्पमित्राने रुग्णालयात येऊन तपास करण्याच्या नावावर नातेवाईकाकडून ५०० रुपये वसूल केले. अशाचप्रकारे एखाद्याच्या घरी साप निघाला तर हे सर्पमित्र ताे पकडण्यासाठी ५०० ते १००० रुपये वसूल करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. अशांमुळे सामाजिक दायित्व म्हणून प्रामाणिकपणे साप पकडणारे सेवाभावी सर्पमित्रही बदनाम हाेत आहेत. शहरातील अनेक सर्पमित्रांनी नियमानुसार घटनास्थळी पाेहोचल्यानंतर सर्प रेस्क्यू केल्यानंतर केवळ पेट्राेल खर्च म्हणून १०० रुपये घेतात. यापेक्षा अधिक मागणी केली जात नाही. मात्र काहींनी याला व्यवसाय बनविल्याचे दिसते. सर्पमित्र अनेकदा सर्पदंश झालेल्या रुग्णाला भेटायला रुग्णालयात जातात व त्यांची हिंमत वाढवितात; मात्र रुग्णांच्या नातेवाईकांकडून अशाप्रकारे पैसा वसूल करणे लाजीरवाणे असल्याचे काही सर्पमित्रांनी व्यक्त केले.
पैसे मागणाऱ्यांवर व्हावी कारवाई
विदर्भ सर्पमित्र समितीचे अध्यक्ष मोनूसिंह म्हणाले, साप रेस्क्यू करणे व रुग्णाला दिलासा देणे हे सेवाकार्य आहे; मात्र कुणी पैसा घेऊन फसवणूक करीत असेल तर त्यांच्याविराेधात वन विभागाने कारवाई करायला हवी. वाईल्डलाईफ वेल्फेअर साेसायटीचे पदाधिकारी नितीश भांदककर यांनी साप पकडायला गेलेले सर्पमित्र केवळ पेट्राेलचे १०० रुपये घेतात. त्यापेक्षा अधिक घेतले जात नाही. कुणी अशाप्रकारे वसुली करीत असेल तर त्याच्याविराेधात वनविभागाकडे तक्रार करायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले.