सर्पमित्रांना स्वत:ची नोंद वन विभागाकडे करणे बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 08:29 PM2020-06-13T20:29:16+5:302020-06-13T20:31:58+5:30
स्वत:ला सर्पमित्र असल्याचे सांगून अपुऱ्या ज्ञानावर साप पकडण्याचे धाडस करणे अंगलट आल्याच्या घटना अनेकदा घडल्या. यामुळे यापुढे सर्पमित्रांनी स्वत:ची नोंद वन विभागाकडे करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वत:ला सर्पमित्र असल्याचे सांगून अपुऱ्या ज्ञानावर साप पकडण्याचे धाडस करणे अंगलट आल्याच्या घटना अनेकदा घडल्या. यामुळे यापुढे सर्पमित्रांनी स्वत:ची नोंद वन विभागाकडे करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी २० जून ही अंतिम तारीख देण्यात आली आहे.
आता पावसाळा सुरू झाल्यामुळे साप बाहेर निघण्याचे प्रकार वाढणार आहेत. अशावेळी नागरिकांकडे असलेल्या माहितीच्या आधारावर साप पकडण्यासाठी संबंधित व्यक्तींना पाचारण केले जाते. मात्र बरेचदा अशा व्यक्तींना यासंदर्भात अपुरे ज्ञान असते. यामुळे दुर्घटना घडतात. तसेच सापाला पकडून ठेवणे, उपाशी ठेवणे तसेच त्याचे प्रदर्शन करणे यासारखे अनुचित प्रकार घडतात.
नागपूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने नाग, मण्यार, फुरसे, घोणस, पट्टेरी मण्यार, चापडा हे विषारी साप, तसेच मांजऱ्या, हरणटोळ, अंडीभक्षक साप, फॉस्टेन मांजऱ्या हे निमविषारी आणि तस्कर, अजगर, धामण, कुकरी, कवड्या, पट्टेरी कवड्या, पानदिवड, रुखई, गवत्या, धुळ नागीण, नानेटी, वाळा हे बिनविषारी साप अस्तित्वात आहेत. काही सर्पमित्र साप पकडून कित्येक दिवस घरी बाळगतात. साप हा वन्यजीव (संरक्षण), अधिनियम १९७२ च्या अनुसूचीमध्ये मोडतो. त्यामुळे सापांबद्दल होणारे असे प्रकार टाळण्यासाठी सर्पमित्रांनी आपल्या नावाची नोंद वन विभागाकडे करून घेण्याचे आवाहन उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांनी केले आहे. आधार कार्ड व रहिवासी प्रमाणपत्रासह सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथे उपस्थित राहून सर्पमित्रांना आपल्या नावाची नोंद या मुदतीत करून घ्यावी लागणार आहे.