नागपुरातील थकबाकीदार नगरसेवकांवर एसएनडीएलची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 10:58 PM2017-11-22T22:58:49+5:302017-11-22T23:06:24+5:30
वीज बिलाच्या थकबाकीदार नगरसेवकांविरुद्ध वीज वितरण फ्रेन्चाईसी एसएनडीएलने बुधवारी कारवाई करून त्यांचे वीज कनेक्शन कापले.
ऑनलाईन लोकमत
नागपूर : वीज बिलाच्या थकबाकीदार नगरसेवकांविरुद्ध वीज वितरण फ्रेन्चाईसी एसएनडीएलने बुधवारी कारवाई करून त्यांचे वीज कनेक्शन कापले. नऊ नगरसेवकांनी कारवाईच्या भीतीने थकबाकी भरली. युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नगरसेवक बंटी शेळकेच्या घरी त्यांचे वडील बाबा शेळके यांनी एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे कारवाईने हिंसक वळण घेतले.
मागील काही दिवसांपासून एसएनडीएल आणि नगरसेवकांमध्ये वीज बिलावरुन वाद सुरू आहे. थकबाकीदार नगरसेवकांची नावे जाहीर केल्यामुळे भाजपाच्या नगरसेवकांनी एसएनडीएलच्या छापरुनगर कार्यालयावर मोर्चा काढला होता. दरम्यान तोडफोड झाल्यामुळे हा वाद आणखीनच चिघळला. एसएनडीएलच्या तक्रारीवरून पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहेत. दरम्यान महावितरणने एसएनडीएलला नोटीस जारी करून कंपनीवर ९० कोटींची थकबाकी असल्याचे सांगितले. चालू महिन्याचे ४५ कोटी आणखी वाढणार आहेत. नोटीसमध्ये कंपनीला त्वरित थकबाकी भरण्यास सांगण्यात आले आहे. नोटीसनंतर एसएनडीएलने नागरिकांकडून थकबाकी वसुली सुरू करून नगरसेवकांच्या घरी कर्मचारी वसुलीसाठी पाठविले.
कर्मचाऱ्यांवर हल्ला
नवी शुक्रवारीत एसएनडीएलची चमू नगरसेवक बंटी शेळके यांच्या घरी गेली तेंव्हा वाद निर्माण झाला. कंपनीच्या चमूने विद्युत खांबापासून वीज कापली. यावर बंटीचे वडील बाबा शेळके यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना चापट मारली. परंतु चमूने वीज कनेक्शन जोडले नाही. एसएनडीएलने पोलिसात तक्रार नोंदविली. बंटी शेळकेवर २ लाख ५६ हजार रुपये थकबाकी आहे. कॉंग्रेसचे नगरसेवक कमलेश चौधरी यांच्या घरी कुठलाही वाद न होता कारवाई करण्यात आली. सुषमा चौधरी यांनी त्यांचे मीटर वेगाने फिरत असल्याची तक्रार केल्यामुळे दुसरे मीटर लावून तपासणी करण्यात आली. चौधरी यांनी गुरुवारी चेक देण्याचे आश्वासन दिल्यामुळे त्यांचे कनेक्शन कापले नाही.
एसएनडीएल कार्यालयात स्मशान शांतता
नगरसेवकांवर कारवाई करण्यात आल्यामुळे एसएनडीएलच्या छापरुनगर कार्यालयात स्मशान शांतता पसरली. कार्यालयावर मोठा मोर्चा येणार असल्याची शंका असल्यामुळे अधिकारी आधीच सतर्क झाले. कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना दुपारीच सुटी देण्यात आली. यामुळे कार्यालयाचे कामकाज प्रभावित झाले. परंतु कुणीच विरोध करण्यासाठी न आल्याने अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.