एसएनडीएलची पुन्हा चौकशी
By admin | Published: December 24, 2015 03:27 AM2015-12-24T03:27:28+5:302015-12-24T03:27:28+5:30
वीज वितरण फ्रेन्चायसी एसएनडीएलच्या कामकाजाची तपासणी करण्यासाठी नेमण्यात आलेली उच्चस्तरीय समिती पुन्हा एकदा चौकशी करेल,
बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा
नागपूर : वीज वितरण फ्रेन्चायसी एसएनडीएलच्या कामकाजाची तपासणी करण्यासाठी नेमण्यात आलेली उच्चस्तरीय समिती पुन्हा एकदा चौकशी करेल, अशी घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत बुधवारी केली. करारानुसार तीन वेळा नोटीस देऊनही सुधारणा न झाल्यास करार रद्द केला जाऊ शकतो. चौकशीत गडबड आढळली तर सरकार नक्कीच कारवाई करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रश्नोत्तराच्या तासात आ. विकास कुंभारे, सुधाकर कोहळे यांनी यासंबंधीचा उपप्रश्न उपस्थित केला होता. कुंभारे म्हणाले, एसएनडीएल नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात वसुली करीत आहे. एसएनडीएलच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीनेही यावर आक्षेप घेत एसएनडीएलला फटकारले आहे. त्यामुळे या कंपनीचा करार रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली. आ. सुधाकर कोहळे यांनी देखील हा मुद्दा लावून धरत एसएनडीएलच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर उत्तर देताना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, लोकप्रतिनिधी व नागरिकांचा रोष पाहता एसएनडीएलच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली होती.
या समितीने एसएनडीएलला दोन महिन्यांची नोटीस देऊन कामकाजात सुधारणा करण्याची ताकीद दिली आहे. नोटीस कालावधीनंतर समिती पुन्हा चौकशी करेल. त्यानंतरही सुधारणा झाली नाही तर पुन्हा तिसऱ्यांदा नोटीस दिली जाईल.
यानंतरही सुधारणा न झाल्यास करार रद्द केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)