एसएनडीएल नकोच!
By admin | Published: May 10, 2015 02:20 AM2015-05-10T02:20:57+5:302015-05-10T02:20:57+5:30
नागपूर शहरातील वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएल नागरिकांची लूट करीत असून ही फ्रेन्चार्इंजी नकोच.
नागपूर : नागपूर शहरातील वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएल नागरिकांची लूट करीत असून ही फ्रेन्चार्इंजी नकोच. ती रद्द करून शहरातील वीज वितरणाचा कारभार पुन्हा महावितरणकडे सोपविण्यात यावा, अशी एकमुखी मागणी शहरातील लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह विविध संघटनांच्यावतीने करण्यात येत आहे. यासंबंधात सत्यशोधक समितीकडे आमदार, नगरसेवक, संघटनांचे पदाधिकारी आणि व्यक्तिगतरीत्या लोकांनी लिखित तक्रारी केल्या आहेत. आतापर्यंत तब्बल ९ हजार ७०० तक्रारी समितीकडे प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक तक्रारी या वीजचोरीशी संबंधित आहेत. तसेच चुकीचे मीटर रिडिंग करणे, अवास्तव विजेचे बिल आणि एसएनडीएलचे कर्मचारी उद्धटपणे वागत असल्याच्या तक्रारी प्रामुख्याने केल्या जात आहेत.
एसएनडीएलबाबत लोकांच्या वाढत्या तक्रारींच्या संदर्भात आर.बी. गोयनका आणि गौरी चांद्रायण यांची सत्यशोधक समिती स्थापन करण्यात आली आहे. रविभवन येथील कॉटेज क्रमांक २० मध्ये समितीने आपले कार्यालय उघडले असून नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जात आहेत. शनिवारी दुपारी महापौर प्रवीण दटके, मनपा सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांनीसुद्धा एसएनडीएलच्या विरोधात सामान्य नागरिकांच्या तक्रारीसंदर्भात समितीचे अध्यक्ष गोयनका आणि चांद्रायण यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
चर्चेदरम्यान महापौर दटके यांनी सांगितले की, एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांचा व्यवहार अतिशय वाईट आहे. नागरिकांना त्रस्त केले जात आहे. दयाशंकर तिवारी यांनी सांगितले की, एसएनडीएल नागरिकांच्या तक्रारीच ऐकून घेत नाही. त्यांच्याकडे प्रशिक्षित टेक्निशियन नाही. किती वीज दिली जात आहे आणि किती रुपये वसूल केले जात आहे, याची माहिती देणारी व्यवस्थाच नाही. आ. विकास कुंभारे यांनी एसएनडील आल्यापासून नागरिक त्रस्त झाले असल्याचा आरोप करीत एसएनडीएल बरखास्त करण्याची मागणी केली. यावेळी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांनीसुद्धा शनिवारी सत्यशोधक समितीची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली तसेच लिखित तक्रारीचे निवेदन सादर केले. यात त्यांनी महाल झोन एसएनडीएलकडून काढून महावितरणकडे सोपविण्याची मागणी केली. यासोबतच एसएनडीएल आल्यापासून विजेच्या बिलात भरमसाट वाढ झाली आहे. अवास्तव विजेचे बिल पाठविले जात आहे. तसेच कंपनीने आतापर्यंत कुठल्याही प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण केलेल्या नाहीत.
तसेच ग्राहकांवर वीजचोरीचे व अन्य गुन्ह्यांची नोद करून त्यांच्याकडून लाखो रुपये वसूल केले जात आहे. ही रक्कम एसएनडीएलकडून वसूल करून शासनाकडे जमा करण्यात यावी, अशी मागणीसुद्धा त्यांनी यावेळी केली. यावेळी त्यांच्यासोबत कैलास चुटे, रमेश सिंगारे, डॉ. रवींद्र भोयर, नीता ठाकरे, स्वाती आखतकर, रिता मुळे, दिव्या धुरडे, विजय आसोले, संजय ठाकरे, अनिल लांबाडे, परशु ठाकूर आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)