नागपुरात करंट लागून वीज कर्मचारी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 12:20 AM2018-12-06T00:20:37+5:302018-12-06T00:22:43+5:30
बुधवारी साप्ताहिक देखभाल-दुरुस्तीदरम्यान एक वीज कर्मचारी करंट लागून जखमी झाला. महावितरणने या घटनेची माहिती इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरला दिली आहे. ते गुरुवारी या प्रकरणाचा तपास करून आपला अहवाल सादर करतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुधवारी साप्ताहिक देखभाल-दुरुस्तीदरम्यान एक वीजकर्मचारी करंट लागून जखमी झाला. महावितरणने या घटनेची माहिती इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरला दिली आहे. ते गुरुवारी या प्रकरणाचा तपास करून आपला अहवाल सादर करतील.
मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणने बुधवारी देखभाल-दुरुस्ती व मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामासाठी वीजपुरवठा बंद ठेवण्याची घोषणा केली होती. दुपारी १२ वाजता सुभाषनगर चौकाजवळील ट्रान्सफार्मरच्या मेंटेनन्ससाठी वरिष्ठ तंत्रज्ञ एस.के. शिंदे यांनी ३३ केव्ही सुभाषनगर फिडरसाठी ३३ केव्ही आयटी पार्क सब-स्टेशनमधून परमिट (वीज बंद करण्याची मंजुरी ) घेतले होते. महावितरणने यानंतर ए.डी.
एन्टरप्रायझेसच्या माध्यमातून ट्रान्सफार्मर आणि लाईनचे मेंटेनन्स सुरू केले. यादरम्यान सुभाषनगर चौकातील डीटीसीवर काम करीत असलेले ए.डी. एन्टरप्रायझेसचे कर्मचारी रमेश वाल्के यांना विजेचा धक्का बसला.
बॅक करंटमुळे घडली घटना
महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मानकर यांनी या प्रकरणाची माहिती देण्यासाठी इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरला लिहिलेल्या पत्रात ही घटना बॅक कंरटमुळे घडल्याची शंका व्यक्त केली आहे. असे सांगितले जाते की, वीजपुरवठा बंद केल्यानंतर सुभाषनगर येथे सुरू असलेली कामे करण्यासाठी मेट्रो रेल्वेने जनरेटर सुरू केले. याच्या बॅक कंरटमुळे कर्मचारी जखमी झाला.