एसएनडीएल बेचैन, महावितरण तयार : दिवसभर होते मुंबईकडे लक्ष, सुरू होत्या बैठका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 09:57 PM2019-08-14T21:57:57+5:302019-08-14T21:59:04+5:30
शहराच्या वीज वितरणाची जबाबदारी असलेल्या एसएनडीएलने महावितरणला पत्र पाठवून वीज वितरणाची जबाबदारी पूर्ववत सांभाळू शकत नाही, अशी मागणी केल्यामुळे बुधवारी दिवसभर वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराच्या वीज वितरणाची जबाबदारी असलेल्या एसएनडीएलने महावितरणला पत्र पाठवून वीज वितरणाची जबाबदारी पूर्ववत सांभाळू शकत नाही, अशी मागणी केल्यामुळे बुधवारी दिवसभर वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते. एसएनडीएलचे कर्मचारी मात्र चिंतेत होते. तिकडे मुंबईत बैठकांचा जोर सुरू होता. आता एसएनडीएल दावा करीत आहे की, त्यांची महावितरणसोबत चर्चा यशस्वी ठरली आहे. मात्र महावितरणचे म्हणणे आहे की, शहरातील विजेची जबाबदारी सांभाळायला आम्ही तयार आहोत.
एसएनडीएलच्या शहरातील सर्व कार्यालयात आज सकाळपासून पत्राची चर्चा सुरू होती. दरम्यान कंपनीचे व्यवसाय प्रमुख सोनल खुराना यांनी कर्मचाऱ्यांना ई-मेल करून कामावर उपस्थित राहण्याचा आग्रह केला. त्यांनी ई-मेलमध्ये कंपनीच्या आर्थिक स्थितीचा हवाला देत स्पष्ट केले की, कंपनीला व्हेंडर व कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास अडचणी आहे. त्यामुळे कंपनीने महावितरणकडून सहकार्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, कंपनी वीज पुरवठा करण्यास कटिबद्ध आहे. कर्मचारी शहराच्या हितार्थ काम करण्यास इच्छुक आहे.
दुसरीकडे महावितरणचे जनसंपर्क सल्लागार पी.एस. पाटील म्हणाले की, कंपनी घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहे. कुठल्याही अपात्कालीन स्थितीत कंपनी नागपूरची जबाबदारी सांभाळायला तयार आहे. महावितरणने अभियंता व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची तयारी सुरू केली आहे. परंतु जे काही होणार आहे, ते फ्रेंचायसी करारांतर्गत होणार आहे. करारानुसार मध्येच काम सोडल्यामुळे एसएनडीएलवर दंडाची वसुली करावी का, यासंदर्भातही विचार होत आहे.
महावितरणशी चर्चा यशस्वी - खुराना
एसएनडीएलचे व्यवसाय प्रमुख सोनल खुराना यांनी लोकमतला सांगितले की, कंपनीची महावितरणशी चर्चा यशस्वी झाली आहे. महावितरणने कंपनीच्या तक्रारी ऐकून घेत, समजूनही घेतल्या आहे. मार्ग काढण्याचा प्रयत्नसुद्धा सुरू आहे. त्यांनी स्पष्ट केले की, कंपनी शहराचा वीज पुरवठा कुठल्याही परिस्थितीत बाधित होऊ देणार नाही. कंपनीसाठी शहराच्या नागरिकांचे हित महत्त्वाचे आहे. वित्तीय संकटातून मार्ग काढण्यासाठी कंपनीने बँकेसोबतही चर्चा सुरू केली आहे.
ठेकेदारांचे २० कोटी रुपये अडकले
या घटनाक्रमामुळे एसएनडीएलमध्ये काम करणारे व्हेंडर (ठेकेदार) चिंतित आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, कंपनी अनेक काम आऊटसोर्सिंगद्वारे आमच्या माध्यमातून करवून घेते. आमचे २० कोटी रुपये एसएनडीएलकडे अडकले आहे. एसएनडीएलने आपली आर्थिक स्थिती मांडल्यामुळे ते संकटात पडले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, महावितरणने त्यांची अडकलेली देयके देण्यासंदर्भातही विचार करणे गरजेचे आहे.