एसएनडीएलच्या कॅशियरने घेतला गळफास
By admin | Published: February 23, 2017 02:13 AM2017-02-23T02:13:13+5:302017-02-23T02:13:13+5:30
एसएनडीएलच्या कॅशियरने गणेशपेठ येथील कार्यालयातच गळफास घेतला. या घटनेमुळे एसएनडीएल
कार्यालयातील घटना : कर्मचाऱ्यांत खळबळ
नागपूर : एसएनडीएलच्या कॅशियरने गणेशपेठ येथील कार्यालयातच गळफास घेतला. या घटनेमुळे एसएनडीएल कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. ही घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली.
अजय मधुकर देशमुख (४६) रा. अयोध्यानगर असे मृताचे नाव आहे. देशमुख यांची सात-आठ महिन्यांपूर्वी सावनेर येथे बदली झाली होती. ते पूर्वी गणेशपेठ मध्यवर्ती बस स्थानक येथील कार्यालयात तैनात होते. कामानिमित्त ते येथे कधी-कधी यायचे. मंगळवारी सुद्धा ते आले होते. मतदानासाठी सुटी असल्याने कार्यालय बंद होते. केवळ सुरक्षा कर्मचारी गणेश तुमडाम ड्युटीवर हजर होते. गणेशसोबत चर्चा करून देशमुख कार्यालयात गेले.
या दरम्यान दोन वेळा ते गणेशजवळ बोलायला आले सुद्धा. रात्री १०.१५ वाजता गणेश कार्यालयात गेला असता देशमुख फासावर लटकलेले आढळून आले. त्याने त्यांना लगेच फासावरून उतरविले. अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. अधिकारी आल्यावर गणेशपेठ पोलिसांना बोलावण्यात आले. पीएसआय पी.ए. आत्राम तिथे पोहोचले. पोलिसांना देशमुख यांच्या खिशात त्यांनी मोबाईलवर टाईप केलेला संदेश सापडला. त्यात देशमुख यांनी चांगले वडील. पती आणि मित्र होऊ न शकल्याची खंत व्यक्त करीत आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी मॅसेजमध्ये ‘मला माफ करा माझ्या कुटुंबाला सांभाळून घ्या, असेही लिहिले आहे. गणेशपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे.(प्रतिनिधी)