मृत्यूच्या वेदनांवर मायेचे ‘स्नेहांचल’

By Admin | Published: May 14, 2017 02:10 AM2017-05-14T02:10:30+5:302017-05-14T02:10:30+5:30

मृत्यू जसे सत्य आहे तसे शाश्वतही. तो येणार हे निश्चित असले तरी कधी येणार हे अनिश्चित असल्याने मृत्यूचे भय कायम डोक्यावर असते

'Snehanchal' of Maya on death pains | मृत्यूच्या वेदनांवर मायेचे ‘स्नेहांचल’

मृत्यूच्या वेदनांवर मायेचे ‘स्नेहांचल’

googlenewsNext

मातृत्वाचा अनोखा आदर्श : रुग्णांमध्ये पेरतात मृत्यूला हसत सामोरे जाण्याचा आत्मविश्वास
शफी पठाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मृत्यू जसे सत्य आहे तसे शाश्वतही. तो येणार हे निश्चित असले तरी कधी येणार हे अनिश्चित असल्याने मृत्यूचे भय कायम डोक्यावर असते मानवाच्या. परंतु कॅन्सरसारख्या आजाराने मृत्यू आणि आपल्यातील अंतर आधीच कळले असेल तर? ... तर मात्र प्रत्येक क्षणाला मरत असतो माणूस आणि प्रत्येक क्षणाचा मृत्यू प्रचंड वेदना देणारा ठरतो. अशावेळी आठवतात आप्त आणि सर्वात जास्त आई. मृत्यू समोर असताना आईची आठवण व्याकुळ करते आणि वेदना आणखी गहिऱ्या होत जातात. अशावेळी या वेदनांना हरवून मृत्यूला हसत सामोरे जाण्याचा आत्मविश्वास रुग्णात निर्माण करण्यासाठी धडपडत असतात ‘स्नेहांचल’मधील नर्सच्या रूपातील माता.

इमामवाड्यातील स्नेहांचल हॉस्पिस अ‍ॅण्ड पॉलिएटिव्ह केअर सेंटर ही संस्था ११ वर्षांपासून मृत्यूच्या वेदनांवर असे मायेचे ‘स्नेहांचल’ अखंड धरून आहे. डॉक्टरांनी हात वर केले की रुग्णाला येथे आणले जाते. या रुग्णांचे नातेवाईक गरीब असतात, असले-नसले सारे पैसे आजारावर खर्च झालेले असतात. आता केवळ मृत्यूची प्रतीक्षा असते. परंतु तीही प्रचंड खर्चिक़ कारण रोज ड्रेसिंग, औषधे लागतातच. ती व्यवस्था ‘स्नेहांचल’ करते. येथे सध्या सात रुग्ण आहेत. यातले बहुतेक ओरल कॅन्सरने ग्रस्त आहेत. जखमेवर ताण आला की रुग्ण ‘आई गं’ म्हणून ओरडतो आणि ‘स्नेहांचल’च्या परिचारिका लगेच त्याला आईच्या ममतेने जवळ घेतात, भळभळणारे रक्त पुसतात, शांत झोप यावी म्हणून प्रेमाने अंगाईही गातात. या रुग्णांची आंघोळ, वेळेच्यावेळी औषधे तर या परिचारिका देतातच शिवाय त्यांना उद्यानात आणून निसर्ग नव्याने दाखवतात, त्या निसर्गात एक दिवस सर्वांनाच विलीन व्हायचे आहे, कुणी आधी जाईल, कुणी नंतर इतकाच काय तो फरक. मृत्यू हा सोहळा आहे मुक्तीचा, त्या सृष्टीनिर्मात्याशी प्रत्यक्ष मिलनाचा. त्यामुळे तो येईल तेव्हा हसत सामोरे जाऊ त्याला, हे सकारात्मक विचार रुजवतात त्या रुग्णाच्या मनात आणि एक दिवस खरेच तो येतो, रुग्णाला सोबत नेतो तेव्हा रुग्णाशी हळवे ऋणानुबंध जुळलेल्या या मातृहृदयी अश्रुंचा पाऊस पडत असतो. आजच्या मातृदिनी त्यांच्या या सेवेला त्रिवार सलाम.

 

Web Title: 'Snehanchal' of Maya on death pains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.