घोरण्यामुळे वाढतो पहाटे हार्ट अटॅक येण्याचा धोका; डॉक्टरांचा सल्ला घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2022 08:10 AM2022-12-25T08:10:00+5:302022-12-25T08:10:02+5:30
Nagpur News घोरणे हे एका एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. घोरण्यामुळे पहाटे ‘हार्ट अटॅक’ येण्याची शक्यता वाढते.
सुमेध वाघमारे
नागपूर : बहुतेक लोक घोरणे ही एक वाईट सवय म्हणून पाहतात. पण घोरण्याला हलक्यात घेऊ नका. घोरणे हे एका एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. घोरण्यामुळे पहाटे ‘हार्ट अटॅक’ येण्याची शक्यता वाढते. या शिवाय, रक्तदाब, ‘ब्रेन स्ट्रोक’, ‘मेमरी लॉस’ही होऊ शकतो. यामुळे घोरण्याच्या सवयीकडे दुर्लक्ष करू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन मेडिकलच्या श्वसनरोग विभागाचे व स्लिप मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी केले आहे.
-घोरणे म्हणजे नेमके काय?
घोरणे म्हणजे झोपेत जीभ, टाळू आणि पडजीभ आदी स्नायू सैल पडल्याने हवेच्या मार्गातील कंपनाने होणारा आवाज आहे. मात्र हा हवेच्या मार्गात अडथळा असल्याने झोपेत शरीरावर याचे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणूनच घोरणे घातक आहे. हवेच्या अडथळ्याच्या प्रमाणानुसार शरीरातील रक्तातल्या प्राणवायूचे प्रमाण निम्म्याच्या खाली जाऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. जवळपास स्त्री-पुरुषांपैकी २० ते २५ टक्के जण झोपेत घोरत असतात.
-घोरण्याची कारणे काय?
घोरणे हे काही अंशी आनुवंशिक असू शकते. मात्र लठ्ठपणा, मधुमेह, धूम्रपान, मद्यपान, मान जाड असणे, गरोदरपणा, उतारवय, नाकातील मार्गामध्ये अडथळा, थायरॉइड संप्रेरकांची कमतरता आदी निरनिराळी कारणे यामागे असू शकतात. वयानुसार स्नायूंमध्ये ढिलाई येऊन घोरणे सुरू होऊ शकते.
-तर स्ट्रोक, बीपी, हृदयरोग, शुगरची शक्यता वाढते
घोरण्यामुळे ‘ब्रेन स्ट्रोक’चा धोका जवळपास ४६ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असते. या शिवाय, जे लोक जास्त घोरतात त्यांना हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकाराची जोखीम, उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. तसेच मधुमेह (शुगर) होण्याची शक्यता सुमारे ५० टक्के जास्त असते.
-काय करायला हवे
जीवनशैलीतील बदल करणे, वजन कमी करणे, झोपण्यापूर्वी अल्कोहोल टाळणे, एका कुशीवर झोपणे यामुळे घोरणे टाळता येते. याव्यतिरिक्त घोरणे टाळण्यासाठी वैद्यकीय उपकरणे आणि शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत जे घोरणे कमी करण्यात मदत करू शकतात.
-घोरण्यावर उपचार आवश्यक
घोरण्याची सवय असल्यास पहाटे हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. या शिवाय, रक्तदाब, हृद्ययाचा पंपिंगमध्ये बदल, ब्रेन स्ट्रोक, कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ, मेमरी लॉस, रक्त जाड होणे, लहान मुलांचा विकास खुंटणे, मानसिक आजार बळावण्याची शक्यता वाढते. यामुळे घोरण्याची सवय असेल तर त्यांनी लगेच उपचार घ्यावेत.
-डॉ. सुशांत मेश्राम, प्रमुख श्वसनरोग व ‘स्लिप मेडिसीन’ विभाग, मेडिकल