आतापर्यंत ५२ रेमडेसिविर इंजेक्शन्स जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:08 AM2021-05-10T04:08:06+5:302021-05-10T04:08:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरात मध्यंतरी कोरोनाचे संक्रमण वाढताच रेमडेसिविर इंजेक्शन्सचा काळाबाजार जोरात सुरू होता. अन्न व औषध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात मध्यंतरी कोरोनाचे संक्रमण वाढताच रेमडेसिविर इंजेक्शन्सचा काळाबाजार जोरात सुरू होता. अन्न व औषध प्रशासन विभागाने मागील १५ एप्रिलपासून तब्बल १४ ठिकाणी धाडी टाकून काळ्याबाजारातील ५२ रेमडेसिविर इंजेक्शन्स जप्त केली. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून ३४ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये रुग्णालयातील वॉर्डबॉय, परिचारिका व काही प्रकरणात डॉक्टरांचाही समावेश आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक यांनी पोलीस स्टेशन वाडी यांच्यासोबत मे. धन्वंतरी औषधालय वाडी येथे २२ एप्रिल रोजी धाड टाकली. त्यावेळी एटीपी कीट विनाबिलाने व ज्यादा दराने विकली जात होती. आरोपींना अटक करण्यात आली. वाडी येथे गुन्हाही दाखल करण्यात आला. यासोबतच हिंगणा येथील मे. सचिन मेडिकल स्टोअर्स यांच्या दुकानात धाड टाकली, तेव्हा सुद्धा एमटीपी कीटची विक्री ज्यादा दराने केली जात असल्याचे रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणात एमआयडीसीत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर इंदोरा चौक येथील मे. अजय मेडिकल स्टोअर्स येथे धाड टाकली असता नारकोटिक औषधांची खरेदी-विक्री विनाबिलाने केली जात होती.
विभागाची करडी नजर, कारवाई सुरूच राहणार
उपरोक्त तिन्ही मेडिकल स्टोअर्सला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. लिखित स्पष्टीकरण आल्यानंतर त्यांच्या औषध परवान्याविरोधात कडक कारवाई केली जाईल. सदर प्रकरणात मे. धन्वंतरी औषधालय वाडी आणि इंदोरा चौकातील मे. अजय मेडिकल स्टोअर्स यांची खरेदी-विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- डॉ. पी. एस. बल्लाळ,
सहायक आयुक्त (औषध), अन्न व औषध प्रशासन विभाग