वृक्षमानवाने संबंधितांना आतापर्यंत भेट दिले तब्बल २५०० वृक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2022 08:02 PM2022-08-24T20:02:35+5:302022-08-24T20:03:02+5:30
Nagpur News चालता फिरता वृक्षमानव म्हणून ओळख असलेल्या सरदार राजिंदरसिंह पलाया यांनी त्यांचे मित्र, नातेवाईक, परिचितांना तब्बल २५५० वृक्ष आतापर्यंत भेट दिले आहेत.
नागपूर : चालता फिरता वृक्षमानव म्हणून ओळख असलेल्या सरदार राजिंदरसिंह पलाया यांनी त्यांचे मित्र, नातेवाईक, परिचितांना तब्बल २५५० वृक्ष आतापर्यंत भेट दिले आहेत. तेवढ्याच झाडांची त्यांनी ठिकठिकाणी लागवडही केली आहे.
एका फार्मसी काॅलेजमध्ये कर्मचारी असलेले पलाया हे नेहमीच्या रस्त्याने जाताना झालेली वृक्षताेड पाहून व्यथित झाले आणि त्यांनी वृक्षाराेपण करण्याचा संकल्प केला. पाच वर्षांपूर्वी केलेला हा संकल्प ते आजतागायत जगताहेत. त्यांच्या जवळ नेहमी झाडांचे राेपटे असते. जिथे माेकळी जागा दिसते, तिथे ते वृक्षाराेपण करीत असतात. केवळ लावत नाही तर त्याचे संगाेपनही करतात.
आतापर्यंत त्यांनी २००० वर झाडे लावली व त्यातली दीड हजार तरी जगली आहेत. याशिवाय त्यांनी वृक्षभेट देणेही सुरू केले. मित्र, परिचित, नात्यातील कुणाचाही वाढदिवस किंवा घरी कार्यक्रम असेल तर राजिंदरसिंह पलाया त्यांना वृक्षभेट देतात. त्यांच्या घरी माेकळी जागा असल्यास लागवडही करतात. अशाप्रकारे पलाया यांनी किमान २५५० झाडे परिचितांना भेट दिली आहेत.
पलाया यांना झाडांचे संगाेपन करायला, झाडांसाेबत रमायला आवडते. त्यांच्या संवर्धनासाठी आपण आयुष्यभर कार्य करीत राहू, असा संकल्प त्यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना व्यक्त केला आहे.