- तर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शिकायचे कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:15 AM2021-03-04T04:15:02+5:302021-03-04T04:15:02+5:30
कैलास निघोट देवलापार : जिल्हा परिषद समाजकल्याण व आदिवासी विकास विभागामार्फत मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, एसएससी परीक्षा फी परत, ...
कैलास निघोट
देवलापार : जिल्हा परिषद समाजकल्याण व आदिवासी विकास विभागामार्फत मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, एसएससी परीक्षा फी परत, गुणवत्ता शिष्यवृत्ती यासारख्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती मिळत होत्या. परंतु यंदा आदिवासी विद्यार्थ्यांना यातून वगळण्यात आले. शाळेकडे तयार असलेली अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती देयके समाजकल्याण विभागाने स्वीकारण्यास नकार दिल्याने मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्या जिल्हा समाजकल्याण विभागाच्या वतीने विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थिंनींना आदिवासी विकास विभागातर्फे सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती मिळत असल्याने त्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती मिळत नव्हती. यासोबतच अनुसूचित जमातींच्या विद्यार्थिंनींना एसएससी परीक्षा फी परत तर गुणवत्ता शिष्यवृत्ती जि.प.च्या समाजकल्याण विभागाकडून देण्यात येत होती. परंतु यंदा सर्व मागास प्रवर्गातील विद्यार्थांची देयके समाजकल्याण विभागाने स्वीकारली. परंतु वरील दोन्ही सवलतीची अनुसूचित जमातीची देयके स्वीकारण्यास नकार दिला.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना समाजकल्याणमार्फत मिळत असलेल्या योजनेची रक्कम ही आदिवासी विकास विभाग, समाजकल्याण विभागाला वळती करतो. परंतु काही वर्षांपासून त्यांना ही रक्कम न मिळाल्याने समाजकल्याण विभाग त्यांची देयके स्वीकारण्यास तयार नाही, अशी माहिती काही मुख्याध्यापकांनी दिली.