- तर कसा होईल रामटेकचा जागतिक पर्यटन विकास?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:18 AM2021-09-02T04:18:46+5:302021-09-02T04:18:46+5:30
रामटेक : पौराणिक वारसा असलेल्या रामटेकचा जागतिक स्तरावरचे पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याच्या बाता अनेकांनी मारल्या आहेत. मात्र या ऐतिहासिक ...
रामटेक : पौराणिक वारसा असलेल्या रामटेकचा जागतिक स्तरावरचे पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याच्या बाता अनेकांनी मारल्या आहेत. मात्र या ऐतिहासिक नगरीत स्वच्छतागृहांची पुरेशी व्यवस्था नसल्याने स्थानिक नागरिक व पर्यटकांची नेहमीच कुचंबणा हाेते. त्यामुळे रामटेक जागतिक स्तरावर पोहोचेल तेव्हा पोहोचेल; आधी शहरातील स्वच्छतागृह कशी नेटकी होतील, याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
रामटेक येथे १८६७ ला नगरपालिकेची स्थापना झाली. या शहराची लाेकसंख्या ३० हजारांच्या वर आहे. बसस्थानक, गडमंदिर, गांधी चाैक, सुपर मार्केट, लंबे हनुमान मंदिर, उपरुग्णालय, तहसील कार्यालय, भाजीपाला मार्केट, राखी तलाव, अंबाळा तलाव या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते.
सध्या रामटेक येथे गांधी चाैकात, सुतिकागृह, भाजीपाला बाजार व नेहरू चाैकात स्वच्छतागृह आहेत. यात केवळ नेहरू चाैकातील सुलभ शाैचालय नवीन बांधले आहे. सुतिकागृह येथील स्वच्छतागृहात महिलांसाठी योग्य सुविधा नाही. तिथेही नेहमीच घाण असते. भाजीपाला बाजारात एक स्वच्छतागृह आहे; पण तिथे कचरा वाढला आहे. तोंडाला कापड बांधून महिलांना येथे जावे लागते. गांधी चाैकातील रस्त्यावर एक स्वच्छतागृह आहे. ते केवळ पुरुषांसाठी आहे.
बसस्थानक चाैक, तहसील कार्यालय परिसर, लंबे हनुमान मंदिर, उपजिल्हा रुग्णालय, गडमंदिर, सुपर मार्केट अशा वर्दळीच्या अनेक परिसरांत सार्वजनिक स्वच्छतागृहांची गरज आहे. तिथे पाण्याची व्यवस्था व स्वच्छता असणे आवश्यक आहे. तिथे चांगल्या प्रकारचे नळ, टाईल्स लावणे आवश्यक आहे.
रामटेक परिसरातील लागून असलेली अनेक गावे रामटेकला येऊन टेकली आहेत. रामटेक तहसील कार्यालय परिसरात विविध कामांसाठी नागरिक येत असतात. पाेलीस ठाणे, काेर्ट, पंचायत समिती याच भागात आहे; पण या परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृह नाही.
गडमंदिराच्या परिसरातही एकच स्वच्छतागृह आहे; पण दुर्गंधीमुळे ते कुणीही वापरत नाही. रामटेकच्या नेहरू मैदानाच्या बाजूला एक सुसज्ज स्वच्छतागृह २०१९ ला ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत बांधला. येथे एका स्वच्छता कर्मचाऱ्याची नियुक्ती ही केली आहे. पण ही जागा चुकीची झाल्याने तेथे कुणीही जाताना दिसत नाही.
दुकानांचे गाळे बांधले; पण....
नगरपालिकेने उत्पन्न वाढावे म्हणून दुकानांचे गाळे बांधले. यात कुणाचाही आक्षेप नाही; पण सुसज्ज स्वच्छतागृहाची व्यवस्था का केली जात नाही. रामटेकच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी अनेक आमदारांच्या काळात विकास आराखडे मंजूर झाले. आताही १५० कोटींचा आराखडा मंजूर झाला आहे. यातील ५० कोटी मिळाले आहेत. यात स्वच्छतागृहाची निर्मिती करण्याचे काम कुठेही दिसत आहे. या विषयावर तीन माजी नगरसेवकांनी उपाेषण केले हाेते; पण हा विषयावर मात्र निर्णय हाेऊ शकला नाही.