... म्हणून जिवंत कारागृहाबाहेर आलो : प्रा. जी. एन. साईबाबा
By नरेश डोंगरे | Published: March 7, 2024 08:14 PM2024-03-07T20:14:12+5:302024-03-07T20:14:57+5:30
कारागृहात प्रचंड नरकयातना मिळाल्या : मानवाधिकारासाठी काम करणे गुन्हा आहे काय
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : सद्भावना राखणाऱ्या देश-विदेशातील अनेकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी होते. त्याचमुळे कारागृहात प्रचंड नरकयातना मिळूनही मी जीवंत कारागृहाबाहेर येऊ शकलो, अशी भावना प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा (वय ५३) यांनी आज पत्रकारांसमोर व्यक्त केली.
मंगळवारी न्यायालयाने प्रा. साईबाबा आणि अन्य संशयितांची निर्दोष मुक्ता केली. या पार्श्वभूमीवर, आज गुरुवारी सकाळी प्रा. साईबाबां यांना येथील मध्यवर्ती कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी मुक्त केले. यानंतर दुपारी ३.३० च्या सुमारास त्यांचे वकिल अॅड. निहालसिंह राठोड यांच्या कार्यालयात प्रा. साईबाबांनी प्रसार माध्यमासमोर आपल्या वेदना मांडल्या. न्यायालयावर विश्वास होता आणि त्याचमुळे सत्याचा विजय झाला, अशी पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली.
प्रकरणाची पार्श्वभूमी सांगताना प्रा. साईबाबा म्हणाले, त्यावेळी ऑपरेशन ग्रीन हंट, सलवा जुडूम जोरात सुरू होते. याचवेळी दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांकावर मोठा अत्याचार केला जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. या अत्याचाराला वाचा फोडून पिडितांना न्याय मिळवून देण्यासाठी कागदपत्र संकलित करण्याचे काम डेमोक्रेटीक पिपल ऑफ दिल्ली या संस्थेचे विचारवंत सुरेंद्र मोहन, आयएएस अधिकारी बी. डी. शर्मा, स्वामी अग्निवेश आणि जस्टीस सच्चार यांनी आपल्याला सोपविले होते. पुढे ही कागदपत्रे सरकारकडे सादर करून पीडितांवरील अत्याचार दूर करण्यासाठी प्रयत्न होणार होते. त्याचेवळी मला अटक करण्यात आली आणि मी संकलित केलेली कागदपत्रे जप्त करून नक्षल समर्थक असल्याचा आरोप लावण्यात आला.
कुठलाही पुरावा नसताना चुकीच्या पध्दतीने केस तयार करून, संशयाच्या आधारे न्यायालयात खटला चालविला. विशेष म्हणजे, न्यायालयाने दोनदा निर्दोष सुटका केली. कदाचित भारताच्या इतिहासातील हे एकमेव प्रकरण असेल असे सांगून माझ्या आयुष्याची माैल्यवान १० वर्ष कोण परत करेल. मी कुटुंबापासून दुरावलो. विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. तो सुवर्ण काळ कसा परत येणार, मानवाधिकारासाठी काम करणे गुन्हा आहे का, असे प्रश्नही साईबाबा यांनी उपस्थित केले.
कारागृहात जाण्यापूर्वी व्हील चेअर सोडल्यास आरोग्य उत्तम होते. कारागृहात नरक यातना मिळाल्या. अत्यावश्यक आरोग्य सुविधा सुध्दा मिळत नव्हती. कारागृहात मिळालेल्या वागणूकीमुळे शरीरात बोलण्याचे बळही उरले नव्हते. दलित, आदिवासीवर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरूध्द आवाज मोठा करणारे तसेच माझ्या समर्थनात ज्यांनी आवाज उठविला, तेदेखिल आज कारागृहात आहेत, असे सांगून त्यांनी या लढ्यात ज्यांनी मदत केली त्या नागपूर, दिल्ली आणि मुंबई येथील वकिलांचे त्यांनी आभार मानले.
तरुण सहकाऱ्याचा मृत्यू वेदनादायी
एका निर्दोष सहकाऱ्याचा कारागृहात असताना मृत्यू झाला. तो तरुण होता, त्याला छोटीशी मुलगी आहे. साईबाबांसोबत अटक करून कारागृहात डांबलेल्या पांडू पोरा नरोटे (वय २८) याच्या मृत्युचे प्रकरण उपस्थित करून एखाद्या तरुणाचा सहजपणे कारागृहात कसा मृत्यू होऊ शकतो, असा लक्षवेधही साईबाबांनी पत्रकार परिषदेत केला.
यापुढेही कायदेशीर लढा देत राहील
मी शिक्षण, विद्यार्थी आणि वर्ग यापासून वेगळा राहू शकत नाही. त्यामुळे पुन्हा विद्यादानाचे काम करत राहील. त्याचप्रमाणे कुठे कुणावर अन्याय अत्याचार होत असेल तर आपण यापुढेही लढा देणार आहो. असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला साईबाबा यांच्या कुटुंबातील सदस्य आणि वकिल मंडळी उपस्थित होती.