...तर मी शिवसेना जिंदाबाद म्हणेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:11 AM2021-08-27T04:11:46+5:302021-08-27T04:11:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यात भाजप- शिवसेना संघर्ष शिगेला पोहोचला असताना आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात भाजप- शिवसेना संघर्ष शिगेला पोहोचला असताना आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी त्यावर भाष्य केले आहे. देशाच्या हितात जे काम करतील त्यांच्या बाजूने आम्ही राहू. भाजपाने देशाच्या हिताचे काम केले, तर आम्ही भाजपा जिंदाबाद म्हणू आणि जर शिवसेनेने चांगले काम केले, तर मी शिवसेना जिंदाबाददेखील म्हणेन, असे प्रतिपादन त्यांनी केले.
गुरुवारी त्यांच्या विदर्भाच्या तीनदिवसीय दौऱ्याला सुरुवात झाली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राजकारणात कधी विरोध होईल व कधी लोक एकत्र येतील, हे सांगता येत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा वाद भविष्यात मिटू शकतो व एकाच ताटात हे दोघे जेऊदेखील शकतात. भाजपा- सेनादेखील भविष्यात एकत्र येऊ शकतात. राजकारणात हे चालतच असते, असे तोगडिया म्हणाले.
तालिबानकडून भारताला धोका
अफगाणिस्तानातील हिंदू व शीख नागरिकांना देशाने नक्कीच सामावून घ्यावे. मात्र, मुस्लीम शरणार्थ्यांना देशात जागा देण्याची आवश्यकता नाही. याच शरणार्थ्यांची पुढील पिढी आपल्या नागरिकांवर अन्याय करायला मागे-पुढे पाहणार नाहीत. फ्रान्ससारख्या देशात हे पाहायला मिळाले आहे. अनेक मुस्लीम देशांनी अफगाणी नागरिकांना प्रवेश नाकारला आहे. भारताला तालिबानकडून धोका असून, देश तालिबानी विचारधारेचे केंद्र आहे. या बाबी विचारात घेऊन त्या दृष्टीने केंद्राने पावले उचलावीत, तसेच दारूम- उलुम- देवबंद, तबलिगी जमात, उलेमा- ए- हिंद या संघटनांवर बंदी टाकावी, असे डॉ. तोगडिया म्हणाले.