तेव्हा कोरोनाचे संक्रमण होत नाही का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:12 AM2021-09-07T04:12:09+5:302021-09-07T04:12:09+5:30
उमरेड : उमरेड येथे २९ ऑगस्टला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उपस्थिती असणारे दोन मोठे कार्यक्रम पार पडले. या ...
उमरेड : उमरेड येथे २९ ऑगस्टला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उपस्थिती असणारे दोन मोठे कार्यक्रम पार पडले. या दोन्ही कार्यक्रमांत हजारांवर नागरिकांची गर्दी झाली. एका कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल तर दुसऱ्या कार्यक्रमात पालकमंत्री नितीन राऊत हजर होते. आता नागपूर जिल्ह्यात दुकानांच्या वेळेत कपात आणि अन्य निर्बंधांबाबत खुद्द पालकमंत्री नितीन राऊत यांनी पाऊल उचलत असल्याचे जाहीर केले आहे. अशावेळी नेत्यांच्या कार्यक्रमात लोकांना कोरोना होत नाही काय, असा सवाल आता विचारला जात आहे.
२९ ऑगस्ट रोजी जुने बसस्थानक येथील मंचावर पालकमंत्री नितीन राऊत यांनी खनिज निधी अंतर्गत निधीतून उमरेड, भिवापूर आणि कुही तालुक्याला मिळालेल्या रुग्णवाहिकेचे व शववाहिकेचे लोकार्पण केले होते. या भव्य कार्यक्रमात नागरिकांनी गर्दी केली. शहरात हॉल-सभागृह असल्याने छोटेखानी कार्यक्रम करता आला असता. शिवाय या कार्यक्रमात अनेकांनी मास्कचा वापर केला नव्हता. अंतराच्या नियमावलीच्याही चिंधड्या उडाल्या. प्रदूषणसुद्धा बघावयास मिळाले. याचदिवशी आशीर्वाद सभागृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कार्यकर्ता प्रवेश मेळावा व सभा घेतली. यामध्ये केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती होती. यावेळी सुद्धा नियमावलीला तिलांजली देण्यात आली. शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आणि उपस्थितीने हॉल हाऊसफुल्ल होता. अद्याप कोरोना संपला नाही, ही बाब दोन्ही नेत्यांनी उपस्थितांना सांगत काळजी घेण्याची विनंती सुद्धा केली. सध्या कोरोनाचे रुग्ण नगण्य असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका संभवतो आहे. अशा कठीणवेळी मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन कितपत योग्य आहे, असा सवाल विचारला जात आहे. आधी नेत्यांनी नियम पाळावेत तरच जनता नियमावली तोडणार नाही आणि कारवाई सुद्धा बेधडक होईल, असे मत व्यक्त होत आहे.