...तर न थांबता निश्चित होणार लांब प्रवास
By admin | Published: February 27, 2015 02:05 AM2015-02-27T02:05:35+5:302015-02-27T02:05:35+5:30
रेल्वे गाड्यांच्या प्रवासदरम्यान येणाऱ्या अडचणींना संपविण्यावर जोर देण्यात आला आहे. उत्पन्न वाढल्यास आरओबी व आरयुबीच्या माध्यमातून ....
नागपूर : रेल्वे गाड्यांच्या प्रवासदरम्यान येणाऱ्या अडचणींना संपविण्यावर जोर देण्यात आला आहे. उत्पन्न वाढल्यास आरओबी व आरयुबीच्या माध्यमातून लेव्हल क्रॉसिंग फाटकांवर लागलेले कॉशन आॅर्डर समाप्त केले जातील. मध्य रेल्वे नागपूर मंडळात एकूण ४० मानवरहित रेल्वे फाटक होते. यापैकी २५ फाटक बंद करण्यात आले आहेत. याशिवाय एप्रिल महिन्यात आणखी ७ फाटक बंद करण्याची योजना आहे. अशा फाटकांवर ‘अलार्म सिस्टीम’ लावण्याचा प्रस्ताव आहे.
कर्मचारी तैनात असलेल्या रेल्वे फाटकांची संख्या २६८ आहे. यापैकी केवळ १० फाटकांनाच बंद करण्यात यश आले आहे. रेल्वे गाड्यांना विविध स्टेशनवर पाणी भरण्यासाठी थांबविले जाते. ही वेळ वाचवण्यासाठी ‘व्हॅक्युम टॉयलेट’ महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. विमानांच्या धर्तीवर रेल्वेमध्ये लागणाऱ्या या आधुनिक ‘टॉयलेट’मुळे पाण्याचा खर्चसुद्धा कमी होईल. यामुळे गाड्यांना एकाच वेळी पाणी भरून चालवणे शक्य होईल.
कॅमेरे लावण्यासाठी आरडीएसओ ठरविणार दिशानिर्देश
महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही रेल्वे गाड्यांमध्ये कॅमेरे लावण्याची घोषणा करण्यात आली आहे. रेल्वे यांत्रिक विभागातील अधिकारिक सूत्रांनुसार रेल्वेमंत्र्यांच्या घोषणेनंतर रिसर्च डिझाईन अॅण्ड स्टँडर्ड आॅर्गनायजेशन (आरडीएसओ) यासाठी स्पेसिफिकेशन निश्चित करेल. कॅमेरे लावण्यासंबंधी मानक व दिशा निर्देश मिळाल्यानंतरच कॅमेरे लावण्यात येतील.
वॉटर कूलर बंद
उन्हाळा सुरू होताच रेल्वे प्रवासी स्टेशनवर थंड पाणी शोधत असतात. परंतु नागपूरसारख्या महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानकावर वॉटर कुलर मशीन बंद पडल्या आहेत. रेल्वे अर्थसंकल्पात वॉटर वेडिंग मशीनची संख्या वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन बंद पडलेल्या मशीन सुरू झाल्यास अधिक चांगले होईल.
‘हॅण्ड हेल्ड डिव्हाईस’ आणणार पारदर्शकता
रेल्वे गाड्यांमध्ये चालणाऱ्या तिकीट चेकिंग स्टाफला रिझर्व्हेशन चार्टपासून मुक्त करण्यासाठी ‘हॅण्ड हेल्ड डिव्हाईस’उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या मशीनमुळे टीटीईचे काम सोपे होईल. इतकेच नव्हे तर या कामात पारदर्शकता सुद्धा येईल.