तर मनपा घेणार नाही घरातील कचरा! आयुक्तांचे फर्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 08:35 PM2020-02-06T20:35:32+5:302020-02-06T20:36:41+5:30
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूरकरांना शिस्त लावण्यासाठी घरातूनच विलगीकृत स्वरूपात कचरा देण्याचे फर्मान काढले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मालमत्ता कर भरला नाही तर जेलची हवा खावी लागेल, अशी तंबी दिल्यानंतर आता महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूरकरांना शिस्त लावण्यासाठी घरातूनच विलगीकृत स्वरूपात कचरा देण्याचे फर्मान काढले आहे. वारंवार सूचना देऊनही जर नागरिक अशाप्रकारे कचरा देत नसतील तर त्यांच्या घरातील कचरा महापालिका उचलणार नाही. अशी तंबी त्यांनी नागरिकांना दिली आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरने सहभाग घेतल्यानंतर महापालिकेतर्फे विविध पातळ्यांवर स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. निर्मिती स्थळावरूनच कचरा ओला आणि सुका अशाप्रकारे देण्यात यावा. यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबतच स्वयंसेवी संस्थाही नागरिकांमध्ये जाऊन जनजागृती करीत आहेत. यासाठी घरात ओला आणि सुका कचरा एकत्रित करण्यासाठी दोन स्वतंत्र कचरापेटी ठेवा, असे वारंवार आवाहन केले आहे. मात्र, त्यानतंरही नागरिकांच्या सवयी बदललेल्या नाहीत.
आयुक्तांनी या बाबीची गंभीर दखल घेतली आहे. गुरुवारी त्यांनी यासंदर्भात फर्मानच जारी केले आहे. यापुढे प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरात दोन स्वतंत्र कचरापेटी ठेवाव्यात. ओला आणि सुका कचरा विलग करूनच स्वच्छतादूताकडे देण्यात यावा. जो व्यक्ती असे करणार नाही त्यांच्यावर यापुढे नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच शहरातील दुकानदार, पानठेले, हॉकर्स, ठेलेधारक तसेच अन्य आस्थापनांनीही आपल्या दुकानांसमोर दोन स्वतंत्र कचरापेट्या ठेवणे बंधनकारक आहे. दुकानातून निघणारा कचरा विलग स्वरूपातच कचरापेट्यांमध्ये टाकावा आणि आजूबाजूच्या परिसरात कचरा होऊ नये, याची काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
ओला आणि सुका कचरापेटीत काय टाकाल?
भाजीपाला, फळे, अन्नपदार्थ, खराब झालेले शिळे अन्न, अंड्यांची टरफले, मासे, कोंबडीची हाडे, सडलेली फळे, चहापावडर, पत्रावळ्या, झाडांच्या कोवळ्या फांद्या, पाने, फुले, पुष्पहार, गवत इत्यादी कचरा ओल्या कचऱ्यामध्ये मोडतो.
सुका कचऱ्यात प्लास्टिकच्या वस्तू, बाटली, शीट्स, बॉक्सेस, पॅकिंग मटेरियल, रॅपर, दूध-दह्याचे पॅकेट्स, वर्तमानपत्र, वह्या, निमंत्रण पत्रिका, पिज्झा, मिठाईचे रिकामे बॉक्स, वाट्या, प्लेटस, चमचे, थर्माकोल, स्पंज, डस्टर, सिरॅमिक कप, बशा, लाकूड, केस, नारळाच्या करवंट्या इत्यादी .