-तर १३०० वर गावात सुरू होऊ शकतात शाळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 10:22 AM2021-06-28T10:22:04+5:302021-06-28T10:23:04+5:30
Nagpur News नागपूर जिल्ह्यात १६६ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले होते तर आतापर्यंत जिल्ह्यातील १३०४ वर गावातून कोरोना परतला आहे. त्यामुळे या गावांमधील शाळा सुरू होऊ शकतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ४२ हजारावर पोहचली आहे. २३०० वर मृत्यू झाले आहेत. पण मे महिन्याच्या पंधरवड्यानंतर जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत गेली. गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात दोन आकड्यातच पॉझिटिव्ह आढळत आहेत. कोरोना कमी होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करता येईल का, याचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागपूर जिल्ह्यात १६६ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले होते तर आतापर्यंत जिल्ह्यातील १३०४ वर गावातून कोरोना परतला आहे. त्यामुळे या गावांमधील शाळा सुरू होऊ शकतात.
कोरोनामुळे मार्च २०२० पासून शाळा बंद आहेत. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये कोरोना शिथिल झाला असताना, शासनाने नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न केला. डिसेंबर महिन्यात त्याला सुरुवात झाली होती. पण कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढला आणि शाळा बंद कराव्या लागल्या. आता तर तिसऱ्या लाटेचा धोका वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविला आहे. शासनाने कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याने शिक्षण वगळता सर्वच क्षेत्र अनलॉक केले आहे. गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्हची संख्या ८ ते १० च्या दरम्यान आहे. २२ लाख लोकसंख्येच्या जिल्ह्यात हा आकडा अत्यल्प आहे. त्यामुळे शासनानेही शाळा सुरू करता येईल का, या दृष्टिकोनातून एक आढावा घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. जिल्ह्यात १९०४ गावे आहेत. मार्च, एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच कहर केला असतानाही जिल्ह्यातील १६६ गावात कोरोना पोहचू शकला नाही. मे महिन्याच्या पंधरवड्यापासून जिल्ह्यातील कोरोनाचे संक्रमण हळूहळू ओसरत आहे. आतापर्यंत १३०४ गावे कोरोनातून मुक्त झाली आहेत.
- जिल्ह्यातील शाळा
जिल्हा परिषदेच्या शाळा - १५३०
नगर परिषदेच्या शाळा - ६८
अनुदानित शाळा - ६९२
विना अनुदानित शाळा - ४३८
- एकूण विद्यार्थी संख्या - ४,५१,२९०
- दृष्टिक्षेपात
- जिल्ह्यातील एकूण गावे - १९०४
- सध्या कोरोनामुक्त असलेली गावे - १३०४
- शासनाच्या निर्देशानुसारच शाळा सुरू होईल
कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात ओसरत असले तरी, तिसऱ्या लाटेचा इशारासुद्धा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. अनेक गावे जरी कोरोनातून मुक्त झाली असलेही पण शासनाचे आदेश आल्याशिवाय शाळेतील वर्ग आम्ही सुरू करणार नसल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.
- कोरोनाचे संक्रमण वेगात असतानाही आमचे गाव कोरोनापासून दूर राहिले. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. पण तिसऱ्या लाटेचासुद्धा धोका आहे. त्यात लहान मुले बाधित होतील, असे तज्ज्ञांचे भाकीत आहे. त्यामुळे शाळा सुरू करणे आव्हानात्मक आहे.
-सुधीर गोतमारे, सरपंच, खुर्सापार, ता. काटोल