...तर गर्भातच रोखता येईल ‘टाइप-१’ मधुमेह! राष्ट्रीय परिषदेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2023 08:27 PM2023-06-09T20:27:22+5:302023-06-09T20:28:04+5:30
Nagpur News ‘टाइप-१’ मधुमेहावर संशोधन सुरू आहे. हा मधुमेह गर्भातच रोखणे शक्य होईल, अशी माहिती ‘डायबिटीज इन प्रेग्नेंसी स्टडी ग्रुप इंडिया’ (डीआयपीएसआय), चेन्नईचे संस्थापक संरक्षक व पद्मश्री डॉ. व्ही. शेशैया यांनी दिली.
नागपूर : ‘टाइप-१’ मधुमेहावर संशोधन सुरू आहे. संशोधन प्राथमिक टप्प्यावर असले तरी त्याचे चांगले रिझल्ट पुढे येत आहेत. यात यश मिळाल्यास हा मधुमेह गर्भातच रोखणे शक्य होईल, अशी माहिती ‘डायबिटीज इन प्रेग्नेंसी स्टडी ग्रुप इंडिया’ (डीआयपीएसआय), चेन्नईचे संस्थापक संरक्षक व पद्मश्री डॉ. व्ही. शेशैया यांनी दिली.
‘डायबिटीज केअर फाउंडेशन ऑफ इंडिया’ (नागपूर) व ‘सुनील डायबिटिज केअर अँण्ड रिसर्च सेंटर’च्या वतीने आयोजित ९व्या वार्षिक ‘हॅलो डायबिटीज ॲकॅडेमिया - २०२३’च्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन दिवसाच्या विशेष सत्रात ते बोलत होते. डॉ. शेशैया म्हणाले, हे संशोधन गर्भवती माता आणि त्यांच्या पोटातील मुलांसाठी आशेचा किरण आहे. यात गर्भधारणेच्या ९ ते ११व्या आठवड्यात रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण ११०च्यावर गेल्यास ‘स्वादुपिंड इन्सुलिन’ तयार करण्यास सुरुवात करतो. यामुळे आईच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होते. मात्र, इतक्या लवकर इन्सुलिनची निर्मिती होत असल्याने बाळाच्या स्वादुपिंडाला अधिक इन्सुलिन निर्मितीची सवय लागून बाळ ‘हायपरइन्सुलिनमिया’सह जन्म घेऊ शकते. अर्थातच जन्मत: मधुमेहाचा धोका वाढू शकतो आणि पुढील आयुष्यात आरोग्यविषयक गुंतागुंत होऊ शकते.
-गर्भावस्थेतच उपचार आवश्यक
९ ते ११व्या आठवड्यात गर्भाच्या स्वादुपिंडाचा विकास सुरू होतो. या कालावधीत तपासणी केली आणि आईच्या रक्तातील साखरेची पातळी वाढल्याचे आढळल्यास त्यावर उपचार आवश्यक ठरतो. गर्भाच्या विकसनशील स्वादुपिंडाला जास्त इन्सुलिन तयार करण्यापासून रोखता येतो. ज्यामुळे ‘टाइप १’ मधुमेहाचा धोका कमी होतो. सध्या हे संशोधन सुरुवातीच्या टप्प्यात आहे. डेटा संकलन सुरू आहे. संशोधन दीर्घकालीन चालणारे असले तरी सुरुवातीचे परिणाम आशादायक आहेत.
- पुढील २५ वर्षांत टाइप-१ मधुमेहाचे उच्चाटन
डायबिटीज केअर फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सुनील गुप्ता यांनी या संशोधनाच्या संभाव्य परिणामाबद्दल आशावाद व्यक्त केला. ते म्हणाले, हे संशोधन यशस्वी झाल्यास ‘टाइप १’ मधुमेह प्रतिबंधकाच्या पद्धतीत क्रांती घडून येईल. पुढील २५ वर्षांत जेव्हा भारत स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करेल तेव्हा या रोगाचे उच्चाटन होईल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.