सामाजिक सौहार्द केवळ स्वप्न नाही, त्याची पूर्तता होणारच : ब्रह्मविहारी स्वामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2021 04:37 PM2021-10-24T16:37:14+5:302021-10-24T16:38:21+5:30
Nagpur News सामाजिक सौहार्दासाठी जगाकडून अपेक्षा करण्याऐवजी अगोदर स्वत:पासूनच सुरुवात केली पाहिजे, असे प्रतिपादन बीएपीएस स्वामिनारायण संस्थेचे धर्मगुरु ब्रह्मविहारी स्वामी यांनी केले.
नागपूर : एक काळ होता जेव्हा चंद्रावर जाणे, अंतराळाची सहल हे स्वप्न वाटत होते. परंतु या गोष्टी प्रत्यक्षात आल्या. अनेकांना जगात सामाजिक सौहार्द नांदेल हे स्वप्न वाटते, परंतु निश्चितच ते पूर्ण होईल हा विश्वास आहे. प्रेमाचा प्रसार, नियमांचे पालन व योग्य जीवनशैलीचा विकास यासाठी संपूर्ण समाजाने एकत्रित प्रयत्न केले तर जागतिक सामाजिक सौहार्द प्रस्थापित केला जाऊ शकतो. सामाजिक सौहार्दासाठी जगाकडून अपेक्षा करण्याऐवजी अगोदर स्वत:पासूनच सुरुवात केली पाहिजे, असे प्रतिपादन बीएपीएस स्वामिनारायण संस्थेचे धर्मगुरु ब्रह्मविहारी स्वामी यांनी केले.
जगासमोर अनेक प्रश्न असतात. यांची उत्तरे शोधण्याची जबाबादारी आपलीच आहे. जेव्हा योग्य प्रश्न विचारण्याची क्षमता असेल तेव्हाच कुठल्याही समस्येवर उत्तर मिळू शकते. आध्यात्मिकता व धर्म ही देशाची संस्कृती आहे. परंतु अनेकदा त्याचे योग्य पद्धतीने पालन होत नाही. धर्माच्या नावाखाली लोक हेटाळणी करतात. जर आध्यात्मिकता व धर्माचे योग्य दिशेने अनुसरण झाले तर जगात शांतता व सौहार्द प्रस्थापित करता येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
गुजरातच्या अक्षरधाम मंदिरावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की त्यावेळी देशातील ७५ टक्के लोक न्याय व बदल्याची भाषा करत होते. परंतु प्रमुखस्वामी महाराज यांनी शांततेचे आवाहन केले. न्यायापेक्षा शांतता केव्हाही मोठी असते हाच त्यांचा विचार होता. गुजरातच्या लोकांनी त्यांच्या आवाहनाचे पालन केले व त्यामुळेच शांतता प्रस्थापित झाली. जगात एकच धर्म राहील असा विचार करणे अयोग्य आहे. देवालाच विविधता आवडते. म्हणूनच निसर्गात वेगवेगळा सुगंध, चव असलेली फुले, फळ आहे. धर्माचार्य मंचावर जो संवाद करतात तोच अनुयायांपर्यंत पोहोचायला हवा व तोच संवाद ह्रद्यापर्यंत पोहोचून त्याचे अनुसरण व्हायला हवे. सौहार्द वाढावायचा असेल तर स्वत: त्याग करण्याची भावना निर्माण व्हायला हवी आणि प्रेम, नियम व जीवनावर प्रेम ही त्रिसूत्री लक्षात ठेवायला हवी. एकमेकांवर फुलाप्रमाणे प्रेम करावे. सौहार्दासाठी आवश्यक नियम व कायदे निर्माण झाले पाहिजे ही काळाची गरज आहे. तसेच सामाजिक सौहार्द वाढेल अशी जीवनशैली विकसित करायला हवी. स्वत:च्या धर्मासोबत इतर धर्मांचादेखील आदर केला तर एकात्मता वाढीस लागले, अशी भावनादेखील त्यांनी व्यक्त केली.
अबुधाबीचे मंदिर सामाजिक समरसतेचे उदाहरण
अबुधाबीसारख्या मुस्लिम देशात हिंदू मंदिर साकारत आहे ही मोठी बाब आहे. हेदेखील एकेकाळी स्वप्नच होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे इच्छा व मार्ग आहे. त्यातून हे स्वप्न पूर्ण होत आहे. अबुधाबीच्या राज्यकर्त्यांनी मंदिरासाठी अगोदर साडेतेरा एकर जागा दिलीच. शिवाय नंतर पार्किंगसाठी आणखी साडेतेरा एकर जागा दिली. एका मुस्लिम राजाने हिंदू मंदिरासाठी जागा दिली. या मंदिराचे आर्किटेक्ट ख्रिश्चन आहेत, प्रकल्प व्यवस्थापक शीख आहेत, कंत्राटदार पारसी आहेत तर चेअरमन जैन आहेत. खरोखरच हे मंदिर सामाजिक समरसतेचा आदर्श प्रस्थापित करणारे ठरणार आहे, असे ब्रह्मविहारी स्वामी यांनी सांगितले.