शेतकऱ्यांच्या हाती ‘सॉईल हेल्थ कार्ड’
By admin | Published: May 30, 2017 01:54 AM2017-05-30T01:54:18+5:302017-05-30T01:54:18+5:30
आज माणसाच्या आरोग्याप्रमाणेच शेतकऱ्यांच्या जमिनीच्या आरोग्याचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
पहिला टप्पा पूर्ण : १ लाख ९० हजार शेतकऱ्यांना मिळाले कार्ड
जीवन रामावत । लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आज माणसाच्या आरोग्याप्रमाणेच शेतकऱ्यांच्या जमिनीच्या आरोग्याचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रासायनिक खते, जहाल विषारी औषधे आणि पाण्याच्या अतिवापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. जमीन निकस होऊ लागली आहे. शेतकऱ्यांची या संकटातून सुटका करण्यासाठी केंद्र शासनातर्फे मागील तीन वर्षांपासून ‘जमीन आरोग्य पत्रिका’ (सॉईल हेल्थ कार्ड) अभियान राबविले जात आहे. या अभियानात जिल्ह्यातील एकूण २ लाख ६८ हजार खातेधारक शेतकऱ्यांपैकी तब्बल १ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या हातात त्यांच्या जमिनीच्या आरोग्य पत्रिका (सॉईल हेल्थ कार्ड) देण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, या अभियानाचा नुकताच पहिला टप्प्पा पूर्ण झाला आहे. या पहिल्या टप्प्यात २०१५-१६ मध्ये ८२४ गावांतील एकूण २६ हजार ४६ शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिका वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार वर्षअखेरीस ४३ हजार ९५६ आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले. यानंतर २०१६-१७ या दुसऱ्या वर्षी ५२ हजार ९१ आरोग्य पत्रिकांचे उद्दिष्ट होते, त्यानुसार ५१ हजार ६६ आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आल्या आहेत. आता २०१७-१८ पासून या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयाने या दुसऱ्या टप्प्यात वाटप करण्यात येणाऱ्या आरोग्य पत्रिकांचे नियोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात एकूण १८९९ गावे असून, त्यापैकी पहिल्या वर्षासाठी ९४९ गावांची निवड करण्यात आली आहे. या सर्व गावातील एकूण १ लाख ३४ हजार २०० शेतकऱ्यांना पुन्हा ‘आरोग्य पत्रिका’ वाटप केल्या जाणार आहेत. शिवाय पुढील वर्षी उर्वरित शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिका देण्यात येईल.
अशाप्रकारे येत्या २०२१ पर्यंत तिन्ही टप्पे पूर्ण करण्यात येणार आहे. यानंतर तिन्ही टप्प्यातील शेतकऱ्यांच्या आरोग्य पत्रिकांचे सूक्ष्म अध्ययन करून जमिनीत कोणती सुधारणा झाली की बिघाड झाला, याचा निष्कर्ष काढला जाणार आहे. अलीकडे जिल्ह्यातील शेतकरी हा आपल्या जमिनीच्या आरोग्यासंबंधी प्रचंड सजग झाला आहे.
अनेक शेतकरी स्वत:हून जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयातून माती परीक्षण करून घेत आहेत. त्याचा चांगला परिणामसुद्धा दिसू लागला आहे.
शेतकरी जागृत झाला
पूर्वी जिल्ह्यातील शेतकरी माती परीक्षणासाठी फारसा उत्सुक दिसून येत नव्हता. मात्र मागील दोन-तीन वर्षांत प्रचंड बदल झाला आहे. आज शेतकरी हा जागृत झाला असून, तो स्वत: माती परीक्षणासाठी पुढे येत आहे. हे चांगले संकेत आहे. मागील दोन वर्षांत आम्ही जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या हाती त्याच्या जमिनीची ‘आरोग्य पत्रिका’ पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात आम्हाला यशही मिळाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली असून, यात एकूण ७४,८२६ मातीचे नमुने परीक्षण केले जाणार आहे. त्यापैकी मागील एप्रिल आणि मे महिन्यात प्रत्येकी ११,२२४ नमुन्यांचे परीक्षण करण्यात आले आहेत. तसेच पुढील जून आणि जुलै महिन्यात प्रत्येकी ७,४८३ नमुन्यांचे परीक्षण केले जाणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेत, आपल्या शेतातील मातीचे नि:शुल्क परीक्षण करून घ्यावे.
अर्चना कोचरे,
जिल्हा मृद सर्र्वेक्षण अधिकारी.