सामाजिक न्याय मंत्री खाडे यांनी जात पडताळणी विभागाला धरले धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 09:48 PM2019-07-26T21:48:13+5:302019-07-26T21:51:16+5:30
समाजातील वंचित घटकांना दिलासा देण्यावर भर देण्यात येत असून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी फास्ट ट्रॅकवर काम करा, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. तसेच जात पडताळणी विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत आठ दिवसात अर्ज निकाली काढण्याचे निर्देश दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समाजातील वंचित घटकांना दिलासा देण्यावर भर देण्यात येत असून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी फास्ट ट्रॅकवर काम करा, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. तसेच जात पडताळणी विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत आठ दिवसात अर्ज निकाली काढण्याचे निर्देश दिले.
सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा आढावा मंत्री खाडे यांनी शुक्रवारी घेतला. यावेळी प्रधान सचिव दिनेश वाघमारे, समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर, सह सचिव दिनेश ढिंगळे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, अतिरिक्त आयुक्त भीमराव खंडाते, सहआयुक्त माधव वैद्य, प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, डॉ. मंगेश वानखडे, प्रसाद कुलकर्णी, आशा कवाडे, विनोद मोहतुरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुकेशिनी तेलगोटे, प्राजक्ता इंगळे, सुरेश पेंदाम, विजय झिंगरे, सुनील जाधव, उपायुक्त शरद चव्हाण, उपसंचालक हनुमंत माळी, राजेश ढाबरे आदी उपस्थित होते.
सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सामाजिक न्याय विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत असून प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत या योजना प्रभावीपणे पोहोचविण्यावर भर द्यावा. जातपडताळणी समितीअंतर्गत नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज प्रलंबित असल्याने मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करीत कारवाईचा इशारा दिला. आठ दिवसात अर्ज काढण्याच्या सूचना केल्या. यासाठी आवश्यकता भासल्यास समतादुतांची मदत घेण्याच्याही सूचना त्यांनी केल्या. महामंडळाची आर्थिक स्थिती मजबूत ठेवण्याकरता ‘वन टाइम सेटलमेंट’' सारख्या उपाययोजना राबवून कर्जवसुलीचे प्रमाण वाढविण्यावर भर देण्याचे निर्देशही दिले.
डीबीटीद्वारे देण्यात येणाºया आॅनलाईन शिष्यवृत्तीची प्रकरणे त्वरित निकाली काढावी. यासाठी संबंधित महाविद्यालयांशी समन्वय ठेवावा. आठ दिवसात अर्ज निकाली काढण्याच्या सूचना केल्या. मुलींच्या शाळा आणि वसतिगृहांमध्ये संपूर्ण कर्मचारी वर्ग महिला देण्याच्या सूचनाही केल्या. जिल्हा व तालुकास्तरावर शासकीय वसतिगृहे उभारण्यासाठी योग्य जागांची पाहणी करुन त्या संदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही डॉ. खाडे यांनी दिले.
दीक्षाभूमीला भेट
दरम्यान सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी शुक्रवारी सकाळी दीक्षाभूमीला भेट दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुध्द यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, सुधीर फुलझेले, आर.एन. सुटे, महापालिकेचे सभापती संदीप जाधव, सभापती धर्मपाल मेश्राम, धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, नगरसेविका उषा पायलट, समाजकल्याण उपायुक्त डॉ.सिध्दार्थ गायकवाड, अनुसुचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी, डॉ. राजू पोतदार, रमेश भंडारी, अशोक कोल्हटकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
दीक्षाभूमी स्मारकाच्या विकासासाठी, तसेच या ठिकाणी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिली. तत्पूर्वी सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दीक्षाभूमी चौकातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.