समाजसेवा ही ‘ठेका’ घेऊन करायची गोष्ट नाही - सरसंघचालक 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 02:32 PM2023-04-26T14:32:35+5:302023-04-26T14:35:35+5:30

मेडिकलमधील दीनदयाल भरड अन्न थालीचे लोकार्पण

Social service is not a 'contract' thing - RSS chief mohan bhagwat | समाजसेवा ही ‘ठेका’ घेऊन करायची गोष्ट नाही - सरसंघचालक 

समाजसेवा ही ‘ठेका’ घेऊन करायची गोष्ट नाही - सरसंघचालक 

googlenewsNext

नागपूर : १४० कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात केवळ सरकारकडूनच समाजाच्या सेवेची अपेक्षा करणे अयोग्य आहे. मात्र, समाजाच्या सेवेसाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. आपला देश म्हणून प्रत्येकाने समाजसेवा करायला हवी. ती एखादा ‘ठेका’ घेऊन करायची गोष्ट नाही, असे मत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. मेडिकल इस्पितळात श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टद्वारे संचालित दीनदयाल थालीच्या सायंकालीन भरड अन्न थालीच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान ते मंगळवारी बोलत होते.

मेडिकलच्या अधिष्ठाता कार्यालयातील सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला आ.मोहन मते, जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., मेडिकलचे अधिष्ठाता डॉ.राज गजभिये प्रामुख्याने उपस्थित होते. आजच्या काळात अन्न, वस्त्र व निवारा यांच्यासोबतच आरोग्य व शिक्षण याही मूलभूत गरजा झाल्या आहेत. मात्र, देशाची लोकसंख्या पाहता, शासन व प्रशासनही प्रत्येकाची गरज पूर्ण करू शकत नाही. अशा स्थितीत नागरिकांनी स्वत: पुढाकार घेत, समाजातील गरजूंना मदतीचा हात दिला पाहिजे.

जोपर्यंत देशात सर्वच प्रकारची समानता येत नाही, तोपर्यंत सेवेची आवश्यकता भासणारच आहे. सेवा करताना त्यात दयेचा नव्हे, तर करुणेचा भाव असावा. सेवेच्या भावनेत स्वार्थ नकोत, तर आपलेपणा असणे जास्त महत्त्वाचे आहे. करुणेचे महत्त्व जगालाही पटले असून, नागपुरात झालेल्या ‘सी-२० समिट’मध्येही त्यावर मंथन झाले. करुणेचे ‘ग्लोबलायझेशन’ होण्याची आवश्यकता आहे, असे सरसंघ चालक म्हणाले. यावेळी दिव्यांग मुलांना ‘हेल्थ कार्ड’ देण्यात आले. श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी प्रास्ताविकाच्या दरम्यान दीनदयाल थाली आता दोन्ही वेळेला उपलब्ध राहील, असे सांगत, नवीन प्रकल्पांविषयी माहिती दिली. रेणुका देशकर यांनी संचालन केले, तर पराग सराफ यांनी आभार मानले.

Web Title: Social service is not a 'contract' thing - RSS chief mohan bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.