सोशल व्हायरल; मोबाइल चार्ज करून ठेवा, दळण दळून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2023 08:10 AM2023-01-04T08:10:00+5:302023-01-04T08:10:01+5:30
Nagpur News ४ जानेवारीपासून वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. तीन दिवसांचा हा संप राहणार असल्याने सध्या या संपाच्या पार्श्वभूमीवर आपले मोबाइल चार्ज करून ठेवा, पाण्याच्या टाक्या भरून घ्या आणि दळण दळून घ्या, असे आवाहन करणारा मेसेज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
नागपूर : ४ जानेवारीपासून वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. तीन दिवसांचा हा संप राहणार असल्याने सध्या या संपाच्या पार्श्वभूमीवर आपले मोबाइल चार्ज करून ठेवा, पाण्याच्या टाक्या भरून घ्या आणि दळण दळून घ्या, असे आवाहन करणारा मेसेज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी संघर्ष समितीच्या नावाने सर्व विद्युत ग्राहकांना उद्देशून एक विनंतीपर पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या व्हायरल मेसेजमधील पत्रात म्हटले आहे, ४, ५, ६ जानेवारी २०२३ ला संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वीज कर्मचारी संपावर राहतील. हा संप तुम्हाला त्रास होईल अशा उद्देशाने बिलकुल नाही. पण उद्या मोबाइलच्या रिचार्जप्रमाणे विजेचे दर सामान्य ग्राहकाला परवडणारे राहणार नाहीत. काही ग्राहक सेवेमुळे दुखावलेले असतील, वसुलीमुळे नाराज असतील पण सार्वजनिक उद्योग टिकला पाहिजे. तो कोणताही का असेना. वीज ही रोजच्या वापरातील सर्वांना हवी असणारी वस्तू आहे. ती उद्या खासगी भांडवलदाराच्या हातात गेल्यास भविष्यातील दरवाढ ग्राहकाला मुळीच परवडणारी नसणार, याकरिता हा संप आहे, असे म्हणत होणाऱ्या त्रासाबद्दल वीज ग्राहकांची माफीसुद्धा मागण्यात आली आहे.