सोशल व्हायरल! आकाशातून झेपावणाऱ्या ‘त्या’ रंगीत पट्ट्याचे रहस्य काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2023 09:10 PM2023-02-02T21:10:44+5:302023-02-02T21:12:41+5:30
Nagpur News विदर्भातील काही शहरांमधून अवकाशात ओळीने १५ ते २० ठिपके गुरुवारी सायंकाळी सातनंतर दृष्टीस पडले. हा पट्टा कशाचा असावा याबाबत नागरिकांमध्ये बरीच चर्चा रंगली व त्याचे व्हिडिओज सोशल मिडियावर झपाट्याने व्हायरल झाले.
नागपूर, अमरावती, चंद्रपूर : विदर्भातील काही शहरांमधून अवकाशात ओळीने १५ ते २० ठिपके गुरुवारी सायंकाळी सातनंतर दृष्टीस पडले. ओळीने असलेले हे शुभ्र ठिपके पाच मिनिटांपर्यंत लोकांनी बघितले. काहींच्या मते, हा धूमकेतू असावा, तर काहींनी एलियन्सशी त्याचे नाते जोडले. तथापि, हा स्टार लिंकचा प्रकार असल्याचे स्पष्टीकरण खगोलतज्ज्ञांनी दिले आहे.
गुरुवारी सायंकाळी ७.१५ वाजताच्या दरम्यान पश्चिमेकडून उत्तर दिशेकडे एक रंगीत पट्टा धावत असल्याचे नागरिकांना दिसून आले. हे दृश्य फक्त दहा ते पंधरा मिनिटांचे होते. काही लोकांचे आकाशाकडे लक्ष गेले असता त्यांना त्याबद्दल कुतूहल निर्माण झाले. मात्र ते नेमके काय आहे, याबद्दल काहीही कळू शकले नाही. याबाबत नागरिकांत वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. यापूर्वीही जिल्ह्यात पृथ्वीच्या दिशेने एक रिंग व गोळा अशा पद्धतीने आकाशातून झेपावला व सिंदेवाही तालुक्यात जमिनीवर पडला. आता अशा पद्धतीचे नागरिकांत कुतूहल निर्माण करणारा प्रकार घडल्याने रहस्य उलगडण्याची उत्कंठा नागरिकांत आहे.
अवकाशात निदर्शनास आलेले हे ठिपके ही एक स्टार लिंक असून, एलन मस्क यांनी त्यांच्या खासगी कंपनीद्वारे अशा प्रकारे इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी पाठवलेले ते उपग्रह आहेत, अशी माहिती मराठी विज्ञान परिषदेद्वारा संचालित स्टार गेझर क्लबचे प्रवीण गुल्हाने तसेच खगोलप्रेमी विजय गिरुळकर यांनी दिली. भारतात स्टार लिंकची इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी पुन्हा तयारी सुरू केली आहे. मस्क यांच्या कंपनीने यासाठी दूरसंचार विभागाकडे जीएमपीसीएस परवान्यासाठी अर्ज केला होता. स्टार लिंक ही एलन मस्क यांची उपग्रहाधारित इंटरनेट सेवा आहे. ही सेवा भारतात विस्तार करण्याचा प्रयत्न होत आहे. स्टार लिंक या सेवेला मस्क यांची कंपनी चालवते. कंपनीने ग्लोबल मोबाइल पर्सनल कम्युनिकेशन बाय सॅटेलाईट सर्व्हिसेस परवान्यासाठी दूरसंचार विभागाकडे पुन्हा अर्ज केला आहे. याआधीही कंपनीने भारतात सेवेसाठी प्रयत्न केला होता. गतवर्षी कंपनीने स्टार लिंक इंटरनेट सर्व्हिसेससाठी नोंदणीही सुरू केली होती. तथापि, दूरसंचार विभागाच्या इशाऱ्यानंतर कंपनीने काही दिवसांनंतर प्री बुकिंग बंद केले.