समाजाने वृद्धाश्रमांची संकल्पना स्वीकारावी
By Admin | Published: August 19, 2015 03:07 AM2015-08-19T03:07:35+5:302015-08-19T03:07:35+5:30
आजच्या स्पर्धेतील धावपळीत कुटुंबाची संकल्पना छोटी होत चालली आहे. त्यामुळे वृद्धाश्रम फूल होत चालली आहेत.
नागपूर : आजच्या स्पर्धेतील धावपळीत कुटुंबाची संकल्पना छोटी होत चालली आहे. त्यामुळे वृद्धाश्रम फूल होत चालली आहेत. आर्थिक विवंचना व कुटुंबातील भांडणे टाळून ज्येष्ठांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी वृद्धाश्रमांच्या संकल्पनेला चालना मिळावी. सरकारने वृद्धाश्रमांना सोईसुविधेने परिपूर्ण केले पाहिजे आणि समाजानेही वृद्धाश्रमांची संकल्पना स्वीकारली पाहिजे, असे मत दिल्ली येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता रवी कालरा यांनी व्यक्त केले.
नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे पत्रकार भवन येथे आयोजित मीट द प्रेस कार्यक्रमात ते बोलत होते. कालरा पुढे म्हणाले, समाजकार्य करतांना वृद्धांच्या समस्या डोळ्यासमोर आल्या. एका निवृत्त न्यायाधीशाच्या मुलांनी संपत्ती हडपून पित्याला घराबाहेर हाकलले. दोन वर्षे बेवारसासारखे राहिलेले हे न्यायाधीश आता कालरा यांच्या गुरुकुलमध्ये आश्रयास आहेत. आपल्या देशात वृद्धांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वाईट होत चालला आहे. पूर्वी जे जीवन लक्झरी वाटायचे, ती आज लोकांची गरज झाली आहे. हे भौतिक सुख मिळविण्यासाठी लोकांची धावपळ सुरू आहे. अनेकांची कमाई कमी आणि खर्च अधिक आहेत. आर्थिक परिस्थिती, घरात होणारी भांडणे यामुळे बऱ्याच वेळा वृद्ध माता-पित्यांना वाईट वागणूक दिली जाते. त्यांचा छळ केला जातो. वृद्धांची अशी अवस्था करण्यापेक्षा त्यांना वृद्धाश्रमात ठेवणे वाईट नाही. पाश्चात्य देशात वृद्धांच्या सामाजिक सुरक्षेबाबत विशेष लक्ष दिले जाते. आपल्याही देशात वृद्धांच्या सामाजिक सुरक्षेचे कायदे अधिक मजबूत केले पाहिजे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ज्येष्ठांसाठी स्वतंत्र व सक्रिय हेल्पलाईन डेस्क असावे. बँकिंग व इतर सुविधा त्यांना सहज उपलब्ध व्हाव्यात व सर्वात महत्त्वाचे म्हणजे वृद्धांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी कालरा यांचे स्वागत केले. पत्रकार विकास झाडे यांनी रवी कालरा यांचा परिचय करून दिला तर राजेंद्र दिवे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)