ठरलेल्या कक्षेबाहेर कार्य करणाऱ्यांना समाज स्मरतो : सुखदेव थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 12:39 AM2019-11-27T00:39:33+5:302019-11-27T00:41:12+5:30
कक्षेबाहेर जाऊन सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेतला. म्हणूनच डॉ. कृष्णा कांबळे यांचे कार्य प्रेरणादायी असल्याची भावना विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष व आंबेडकरी विचारवंत प्रा. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तथागत बुद्ध आणि डॉ. आंबेडकर यांनी श्रेष्ठ माणसांचे गुणधर्म सांगितले आहेत. जे स्वत:च्या शिक्षणाचा, ज्ञानाचा स्वत:सह समाजातील गरीब, गरजू लोकांच्या भल्यासाठी उपयोग करतात त्यांचीच लोक आठवण करतात. डॉ. कृष्णा कांबळे यांनीही डॉक्टर म्हणून असलेल्या त्यांच्या व्यवसायाच्या पलिकडे जाऊन मेडिकलमध्ये येणाऱ्या गरीब रुग्णांची समर्पणाने सेवा केली. या कक्षेबाहेर जाऊन सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेतला. म्हणूनच डॉ. कांबळे यांचे कार्य प्रेरणादायी असल्याची भावना विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष व आंबेडकरी विचारवंत प्रा. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केली.
डॉ. कृष्णा कांबळे नागरी सत्कार समितीच्यावतीने त्यांच्या ७१ व्या वर्षपूर्तीनिमित्त कार्याचा गौरव म्हणून त्यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. दीक्षाभूमी येथील सभागृहात आयोजित या सन्मान समारोहाच्यावेळी माजी न्यायमूर्ती किशोर रोही, नागेश चौधरी, रेव्हरन आईब जोसेफ, डॉ. उदय माहूरकर, बालचंद्र खांडेकर, डॉ. अन्वर सिद्दीकी, त्रिलोक हजारे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. थोरात पुढे म्हणाले, डॉ. कांबळे यांनी सम्यक मार्गाचा अवलंब केला. मेडिकल कॉलेजमध्ये सेवा देताना त्यांनी गरीब, गरजू रुग्णांच्या सेवेत स्वत:ला समर्पित केले. वैद्यकीय सेवेसह सामाजिक कार्यातही त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. टीकेचा विचार न करता समाजातील दोष प्रामाणिकपणे मांडण्याची हिंमत त्यांनी दाखविली. त्यामुळे ते संविधान मार्गाने जगले, असे म्हणणे योग्य ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी न्या. किशोर रोही म्हणाले, कॅन्सर हा कधी न बरा होणारा आजार आहे, त्याप्रमाणे जातीयता, विषमता हे सुद्धा समाजाला लागलेले आजार आहेत. बरे झाले असे वाटते पण नंतर त्यांचे जंतू या ना त्या मार्गाने तोंड वर काढतात. कॅन्सरवर उपचार करणारे डॉ. कांबळे समाजातील असे आजार दूर करण्यासाठी कार्य करीत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. डॉ. माहूरकर यांनी त्यांच्या कॉलेज जीवनाच्या आठवणींना उजाळा दिला. डॉ. जोसेफ, अन्वर सिद्दीकी व इतर मान्यवरांनीही विचार मांडत डॉ. कांबळे यांच्या कार्याबाबत कृतज्ञ भाव व्यक्त केले. यावेळी डॉ. कांबळे यांच्या सेवाकार्यावर प्रकाश टाकणाऱ्या ‘शीलगंध’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. प्रास्ताविक नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांनी केले तर संचालन कोमल ठाकरे यांनी केले.
नागपुरात कॅन्सर रुग्णालय व्हावे हे ध्येय : डॉ. कांबळे
सत्काराला उत्तर देताना डॉ. कांबळे म्हणाले, कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी होते असे नाही, त्यामुळे आयुष्यात जे मिळाले त्यात सर्वोत्तम कार्य करायचे, हे तत्त्व अंगिकारले. आईचे टीबीमुळे निधन झाल्याने त्या विषयाचा डॉक्टर होण्याची इच्छा होती. पुढे कॅन्सरच्या क्षेत्रात सेवा करावी म्हणून हा विषय निवडला. खासगी रुग्णालयात काम सोपे असते, पण मेडिकलमध्ये अनेक अडचणी सहन कराव्या लागतात. मेडिकलमध्ये सेवा देताना प्रामाणिकपणे व समर्पित भावनेने काम केल्याचे समाधान आहे, ही भावना त्यांनी व्यक्त केली. सामाजिक कार्यात योगदान देऊ शकलो, याचेही समाधान आहे. नागपूरमध्ये कॅन्सर रुग्णांच्या सख्येत इतर शहरांच्या तुलनेत अधिक वाढ होत आहे. त्यामुळे येथे गरीब रुग्णांसाठी कॅन्सरचे अद्ययावत रुग्णालय व्हावे, हा माझा प्रयत्न आहे. याबाबत राष्ट्रीयस्तराचा डेटा शासनाकडे दिला. न्यायालयात लढा दिला. न्यायालयानेही आमच्या बाजूने निकाल दिला. पण शासनाने पुढे काही केले नाही. अत्याधुनिक सरकारी कॅन्सर रुग्णालय व्हावे यासाठी प्रयत्न करणार, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.