समाजाने अभिमान बाळगावा अन् कलावंताने स्वाभिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:08 AM2021-03-20T04:08:17+5:302021-03-20T04:08:17+5:30
- लॉकडाऊनच्या घोषणेला एक वर्ष पूर्ण : कव्वालीद्वारे कलावंतांना केले जातेय प्रोत्साहित - तोडले कलाक्षेत्राचे कंबरडे, आत्महत्या पर्याय नव्हे ...
- लॉकडाऊनच्या घोषणेला एक वर्ष पूर्ण : कव्वालीद्वारे कलावंतांना केले जातेय प्रोत्साहित
- तोडले कलाक्षेत्राचे कंबरडे, आत्महत्या पर्याय नव्हे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणामुळे देशात २२ मार्च तर महाराष्ट्रात दोन दिवस आधी २० मार्च २०२० रोजी संपूर्ण टाळेबंदीची घोषणा झाली होती. ती अद्यापही सुरूच आहे. या काळात इतर क्षेत्राप्रमाणेच पूर्णवेळ कलाकौशल्यावर विसंबून असलेल्या कलावंतांची पार वाताहत झाली आहे. समाजाकडून मदतीचा ओघ आटला, सरकारने कधीच लक्ष दिले नाही, अशा स्थितीत कलावंतांचा स्वाभिमान खच खात असल्याचे दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात यश मदनकर, प्रवीण मून या कलावंतांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातून ते बचावले. मात्र, नृत्यांगणा कीर्ती गायकवाड हिला प्राण गमवावे लागले. या गंभीर अवस्थेवर बोट ठेवत सहकर्मी कलावंतांनी आपल्या गायनकौशल्यातूनच कलावंतांना संयम बाळगण्याचे, स्वाभिमान जपण्याचे आणि समाजाने कलावंतांचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या वर्षी कोरोना संसर्ग आणि टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर १७ मार्चपासूनच महाराष्ट्रात कलाक्षेत्रावर निर्बंध आले होते. नाट्यगृह, सभागृह आणि जाहीर कार्यक्रमांना पूर्णपणे बंदी घातली गेली. तब्बल साडेसात महिन्यानंतर ५ नोव्हेंबर २०२० रोजी मराठी रंगभूमी दिनी कलाक्षेत्रावरील टाळेबंदी काही निर्बंधासह संपली. मात्र, १५ मार्चपासून नागपूरसह कंटेन्मेंट झोन असलेली शहरे कुलूपबंद झाली. अशा स्थितीत काही कलावंतांचा जीव आटायला लागला आहे आणि नको ते पाऊल उचलण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ही स्थिती बघता गायक मोहम्मद सलीम शेख व संगीतकार चारुदत्त जिचकार यांच्या संकल्पनेतून कलावंतांना जगण्याचे आवाहन करणारी कव्वाली आकाराला आली आहे. ‘गर्व से कहता के मैं हूँ कलाकार’ अशी ही कव्वाली, कलावंतांना प्रोत्साहित करत आहे. या कव्वालीद्वारे कलावंत एकमेकांना भावनिक आधार देत असल्याचे दिसून येत आहे. मो. सलीम, अभिजित कडू व चिन्मय देशकर यांनी ही कव्वाली गायली असून, विलास डांगे यांचे संगीत व संगीत संयोजन विकास बोरकर व भूपेश सवाई यांचे आहे.
-------
संवाद साधा, संयम बाळगा
संक्रमणाच्या आगीत सारेच होरपळत आहेत. मात्र, सामाजिक कर्तव्य अजूनही जागृत आहे. या काळात कलावंतांनी तग धरावा आणि मित्र, कुटुंबीयांशी संवाद साधत राहावे. सकारात्मकता हेच बळ आहे. कलावंतांच्या मदतीला सारेच धावून येतील.
- अनघा भावे, मानसोपचारतज्ज्ञ
--------------
संघर्ष करण्याचे बळ निर्माण करा
हा काळ खरोखरीच संकटाचा आहे. मात्र, संकटात संघर्ष करण्याचे बळ निर्माण करा. या काळाने प्रत्येकाला उत्पन्नाचे पर्याय तयार ठेवण्याची शिकवण दिली आहे. धीर धरा आणि स्वत:ला उभे करा.
- डॉ. दीपक खिरवडकर, संचालक, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र
..................