समाजाने दुर्बलांची शक्ती बनावे
By admin | Published: January 3, 2016 03:29 AM2016-01-03T03:29:17+5:302016-01-03T03:29:17+5:30
शक्ती असलेली व्यक्ती जगण्याची लढाई सहज जिंकते. मात्र, ज्यांच्यात शक्ती नाही त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजाला त्यांची शक्ति बनावे लागेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : रमाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्कार सोहळा
नागपूर : शक्ती असलेली व्यक्ती जगण्याची लढाई सहज जिंकते. मात्र, ज्यांच्यात शक्ती नाही त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजाला त्यांची शक्ति बनावे लागेल. त्याला उभे करावे लागेल, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पुणे सेवासदन सोसायटी नागपूरतर्फे यावर्षीपासून सुरू करण्यात आलेला रमाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्कार ‘संज्ञा संवर्धन संस्था, नागपूर’ या संस्थेला देण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश्वर उत्तरवार यांना प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, मानपत्र व ५१ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी विशेष अतिथी म्हणून महापौर प्रवीण दटके, आ. नागो गाणार, संस्थेच्या अध्यक्ष कांचन गडकरी, सचिव इंदुबाला मुकेवार, वासंती भागवत उपस्थित होत्या.
या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, समाजात ज्यांना गरज आहे त्यांच्या पाठिशी कोण उभा राहतो हे महत्त्वाचे आहे. विशेष बालकांना शिक्षण देणे हे तेवढेच कठीण आहे. मात्र, संज्ञा संवर्धन संस्थेने अनेक अडचणींचा सामना करीत या बालकांचे शिक्षण व पुनर्वसन करून दाखविले आहे. चांगले काम करणाऱ्या संस्थेची निवड केल्याबद्दल अभिनंदन करीत पुणे सेवासदन सोसायटीसाठी शासनातर्फे शक्य तेवढे करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, सरकारमध्ये चांगले काम करणाऱ्यांना बक्षीस व वाईट काम करणाऱ्यांना शिक्षा मिळत नाही. पण समाजात नेहमी चांगले काम करणाऱ्यांचा गौरव होतो. महिलांना बरोबरीने जगता यावे, त्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी रमाबाई रानडे यांनी या कामाची सुरुवात केल्याचे सांगून कोणत्याही क्षेत्रात स्त्री-पुरुष या आधारावर मूल्यमापन होऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केली. पुणे सेवासदन सोसाटीने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी स्वत:ला वाहून घेतले. पण काही संस्था खूप डोनेशन घेतात. एकप्रकारे पार्टनरशीप सुरू आहे. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण व्हावे पण व्यापारीकरण होऊ नये, शिक्षणाचे दुकान होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करीत शिक्षण संस्थांनी व्यक्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कांचन गडकरी यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली. पुरस्काराला उत्तर देताना डॉ. राजेश्वर उत्तरवार म्हणाले, संस्था गेल्या २२ वर्षांपासून काम करीत आहे. सर्व प्रकारचे शासकीय अनुदान नाकारून केवळ देणग्यांवर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी हा प्रकल्प राबविला जात आहे. शाळेतील कर्मचाऱ्यांना त्यांनी हा पुरस्कार अर्पण केला. कार्यक्रमाला आ. कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, सुधाकर कोहळे, माजी आ. अशोक मानकर आदी उपस्थित होते. यामिनी उपगडे यांनी शारदास्तवन म्हटले. अमर कुलकर्णी यांच्या पसायदानाने समारोप झाला. संचालन आशुतोष अडोणी यांनी केले. अरुण आदमने यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
पद्मश्री, पद्मभूषणसाठी शिफारसपत्र देऊन विटलो
कोणत्याही पुरस्कारासाठी जाहिरात दिली जाऊ नये, असे सांगत पुणे सेवासदन सोसायटीनेही पुढील वर्षी या पुरस्कारासाठी जाहिरात देऊन अर्ज न मागवता समाजातील चांगल्या माणसांच्या मदतीने उत्तम काम करणाऱ्या संस्थेची पुरस्कारासाठी निवड करण्याची सूचना गडकरी यांनी केली. हा धागा धरत गडकरी म्हणाले, लोक समाधानी नाहीत. एक मिळाले की दुसरे काही हवे असते. पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस पत्र देऊन देऊन वीट आला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांना पद्मश्री मिळाला आहे. आता पद्मविभूषण मिळावा म्हणून त्या आपल्या घरी बारा मजले पायऱ्यांनी चढून भेटीसाठी आल्या, अशी घटनाही त्यांनी सांगितली. जे न मागता काम करीत असतात त्यांना परमेश्वर सर्व काही देत असतो, असेही ते म्हणाले.