वैज्ञानिक संशोधनातून समाजाचा उद्धार : शेखर मांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 10:35 PM2019-10-18T22:35:08+5:302019-10-18T22:39:13+5:30
वैज्ञानिक आपल्या संशोधनाच्या माध्यमातून समाजाच्या उद्धारासाठी काम करतात. हाच विचार समाजाच्या प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचविण्यासाठी कोलकाता येथे ५ नोव्हेंबरपासून ‘इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वैज्ञानिक केवळ प्रयोगशाळेत काम करतो व त्याचे केस विखुरलेले असतात. त्यांचे समाजाशी ऋणानुबंध नसतात, अशी समाजात धारणा असते. परंतु प्रत्यक्षात असे चित्र अजिबात नाही. लोकांच्या सहकार्याच्या आधारावरच संशोधन होतात. वैज्ञानिक आपल्या संशोधनाच्या माध्यमातून समाजाच्या उद्धारासाठी काम करतात. हाच विचार समाजाच्या प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचविण्यासाठी कोलकाता येथे ५ नोव्हेंबरपासून ‘इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. याच्याच शृंखलेत ‘नीरी’ येथे १८ ऑक्टोबर रोजी ‘पब्लिक आऊटरिच’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ‘सीएसआयआर’चे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी दिली. ‘नीरी’ येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
यावेळी ‘नीरी’चे संचालक डॉ. राकेश कुमार व वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक प्रकाश कुंभारे उपस्थित होते. ५ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत कोलकाता येथे हा ‘फेस्टिव्हल’ होणार आहे. हे अशाप्रकारचे पाचवे आयोजन आहे. प्रत्येक मतदारसंघातून ५ ते १० गुणवंत विद्यार्थ्यांनादेखील यात पाठवावे असे खासदारांना आवाहन करण्यात आले आहे, असे डॉ. मांडे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रति आवड कमी होत आहे. या क्षेत्रात रोजगार वाढेल तेव्हाच विद्यार्थी या विषयाकडे वळतील. यामुळे विज्ञानाला रोजगारपूरक बनविण्यावर भर देण्यात येत आहे. ‘सायन्स फेस्टिव्हल’ हा एका पद्धतीने विज्ञानाचा कुंभमेळाच आहे. याअंतर्गतच ‘नीरी’त १८ ऑक्टोबर रोजी ‘पब्लिक आऊटरिच’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नीरी’, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन राहणार आहे, असे डॉ. राकेश कुमार यांनी सांगितले. चर्चेच्या अगोदर डॉ. मांडे यांनी ‘नीरी’तील स्मृतिवनाचे उद्घाटन केले.
फटाके कंपन्यांकडून ‘ग्रीन’ फटाके तंत्रज्ञानाचा उपयोग
‘नीरी’ने ‘ग्रीन’ फटाके विकसित केले आहे. यामुळे ३० ते ४० टक्के कमी प्रदूषण होते. या तंत्रज्ञानाचा फटाके उत्पादक कंपन्यांनी यावर्षी उपयोग केला आहे. यावर्षी हे फटाके सर्वत्र उपलब्ध होतील, असे डॉ. शेखर मांडे यांनी सांगितले.