नागपुरात सॉफ्टवेअर, बनावट आयडीने तात्काळ ई-तिकीटांवर दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 11:03 PM2018-10-27T23:03:05+5:302018-10-27T23:06:48+5:30
दिवाळीत रेल्वेगाड्यात प्रवाशांची गर्दी वाढली असून प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळणे बंद झाले आहे. दुसरीकडे इंटरनेटवर उपलब्ध अवैध सॉफ्टवेअर आणि बनावट आयडीच्या साहाय्याने दलाल तात्काळ ई-तिकिटांवर दरोडा टाकत आहेत. आयआरसीटीसीच्या वेबसाईटला हॅक करण्यात येत आहे. रेल्वे बोर्डाच्या स्तरावर हा काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजना होताना दिसत नाही. रेल्वे सुरक्षा दल मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांची धरपकड करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीत रेल्वेगाड्यात प्रवाशांची गर्दी वाढली असून प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळणे बंद झाले आहे. दुसरीकडे इंटरनेटवर उपलब्ध अवैध सॉफ्टवेअर आणि बनावट आयडीच्या साहाय्याने दलाल तात्काळ ई-तिकिटांवर दरोडा टाकत आहेत. आयआरसीटीसीच्या वेबसाईटला हॅक करण्यात येत आहे. रेल्वे बोर्डाच्या स्तरावर हा काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजना होताना दिसत नाही. रेल्वे सुरक्षा दल मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांची धरपकड करीत आहे.
‘लोकमत’ने ई-तिकिटांच्या काळाबाजाराबाबत बारकाईने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. इंडियन रेल्वे कॅटरींग अँड टुरिझम कार्पोरेशन (आयआरसीटीसी) च्या वेबसाईटवर कोणतीही व्यक्ती आपली खासगी माहिती टाकून ई-तिकीट खरेदी करू शकते. आयआरसीटीसीचे लायसन्स मिळालेले दलाल ठरवून दिलेले शुल्क आकारून प्रवाशांना तिकीट पुरवू शकतात. परंतु प्रवाशांना कन्फर्म तिकीट हवे असते. अशा स्थितीत तात्काळ ई-तिकीटाच्या विक्रीच्या वेळी दलाल अवैध सॉफ्टवेअरचा वापर करतात. प्रत्येक प्रवाशाकडून ते २०० ते ५०० रुपये अधिक शुल्क आकारतात. आयआरसीटीसीचे लायसन्स असलेले एजंटच हा काळाबाजार करीत असल्याचे उघड झाले आहे. याबाबत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या आरपीएफचे कमांडंट ज्योती कुमार सतीजा यांच्याकडून जाणून घेतले असता ते म्हणाले, तात्काळ ई-तिकिटांच्या बुकिंगची वेळ ठरलेली आहे. यावेळी सामान्य प्रवासी तिकीट घेऊ शकतात. अर्ध्या तासानंतर दलाल तात्काळ ई-तिकीट बुक करू शकतात. परंतु अर्ध्या तासानंतर त्यांच्या वाट्याला अधिक तिकिटे येत नाहीत आणि त्यांचे ग्राहक सुटतात. अशा स्थितीत दलाल इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अवैध रेडमिर्चीसारख्या सॉफ्टवेअरची मदत घेतात. हे सॉफ्टवेअर सुरुवातीला मोफत असते. त्यानंतर सॉफ्टवेअर विकसित करणारे त्याचे शुल्क आकारतात. दलाल या सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रवाशांची आणि प्रवासाची माहिती, पेमेंटची पद्धती आदी माहिती संगणकात फीड करून ठेवतात. जसा तात्काळ ई-तिकिटाच्या बुकिंगसाठी वेबसाईट आणि काऊंटर उघडतात, दलाल सॉफ्टवेअरने वेबसाईटला एकाप्रकारे हॅक करतात. त्याद्वारे सर्वात आधी त्यांना कन्फर्म तिकीट मिळते. लायसन्स असलेल्या एजंटला तिकिटांची संख्या ठरवून देण्यात आली आहे. ते अधिक तिकीट बुक करण्यासाठी पर्सनल आयडीऐवजी बनावट माहिती वेबसाईटवर टाकून अनेक बनावट आयडी तयार करून सॉफ्टवेअरच्या मदतीने ई-तिकीट बुक करतात. या प्रकारे सामान्य प्रवाशांना मोजकेच ई-तिकीट मिळतात. ते सुद्धा कन्फर्म असतील याचा नेम नाही.
रेल्वे बोर्ड स्तरावर उपाययोजना आवश्यक
‘आरपीएफच्या अधिकाऱ्यांना इंटरनेटवरील अवैध सॉफ्टवेअरमुळे होत असलेल्या काळाबाजाराची माहिती मिळविण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देणे, आयआरसीटीसीच्या वेबसाईटला सक्षम बनविणे, इंटरनेटवरील अवैध सॉफ्टवेअर ब्लॉक करणे, अवैध आयडीद्वारे होत असलेला तिकिटांच्या काळाबाजाराची माहिती मिळविणे आणि विभागीय स्तरावर सायबर सेल सुरू करण्याची विनंती रेल्वे बोर्डाला करण्यात आली आहे. ही मागणी पूर्ण झाल्यास ई-तिकिटांचा काळाबाजारा पूर्णपणे बंद होऊ शकतो. आरपीएफ काळाबाजार करणाऱ्या दलालांची धरपकड करीत आहे. प्रवाशांनीही अधिकृत एजंटकडून ई-तिकीट खरेदी करावे.’
ज्योती कुमार सतीजा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ, नागपूर विभाग