कंकणाकृती सूर्यग्रहण : नागपुरात पावसाळी वातावरणामुळे खगोलप्रेमींची निराशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 07:29 PM2019-12-26T19:29:55+5:302019-12-26T19:31:32+5:30
अनेक वर्षानंतर कंकणाकृती सूर्यग्रहण पहाण्याचा दुर्मिळ योग गुरुवारी आला असला तरी पावसाळी वातावरणामुळे खगोलप्रेमींच्या आणि अभ्यासकांच्या आनंदावर विरजण पडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेक वर्षानंतर कंकणाकृती सूर्यग्रहण पहाण्याचा दुर्मिळ योग गुरुवारी आला असला तरी पावसाळी वातावरणामुळे खगोलप्रेमींच्या आणि अभ्यासकांच्या आनंदावर विरजण पडले. सकाळपासून शहरात सूर्यदर्शनच न झाल्याने केवळ केंद्रावरील प्रात्यक्षिक आणि वाहिन्यांच्या बातम्यांवरच सर्वांना समाधान मानावे लागले.
कंकणाकृती सूर्यग्रहणाचा अनुभव घेण्यासाठी नागरिकांसाह विद्यार्थ्यांनी गुरुवारी सकाळीच रमण विज्ञान केंद्रावर गर्दी केली होती. मात्र अवकाशातील ढगांमुळे सूर्यग्रहण पाहताच आले नाही. अनेकांनी तर पावसाळी वातावरण पाहून केंद्रावर जाणेच टाळले. रमण विज्ञान कें द्राने सिम्युलेटरच्या माध्यमातून कंकणाकृती सूर्यग्रहणाचे प्रतिरूप प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न केला. आपल्या परीने उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांना माहिती देण्याचाही पुरेपूर प्रयत्न केला. मात्र खरेखुरे सूर्यग्रहण पाहता न आल्याने उपस्थितांची जिज्ञासापूर्ती होऊ शकली नाही.
रमण विज्ञान केंद्रावर सोलर गुगल आणि टेलिस्कोपचीही व्यवस्था होती. मात्र त्याचा काहीच उपयोग होऊ शकला नाही. काहींनी उत्सुकतेपोटी त्यातून सूर्यग्रहण पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र ढगांशिवाय काहीच दिसले नाही. सूर्यग्रहण पाहण्याचे प्रयत्न निरर्थक ठरले. विज्ञान केंद्राकडून सूर्यग्रहण पाहण्यासाठी बरेच प्रयत्न झाले, मात्र यश आले नाही. सायंकाळपर्यंत शहरात सूर्यदर्शनच झाले नाही. एक चांगली पर्वणी अवकाशात आली असली तरी वातावरणामुळे ती अनुभवता आली नसल्याची खंत अनेकांनी बोलून दाखविली.