सौर ऊर्जेने सुधारली आरोग्य केंद्र

By admin | Published: August 17, 2015 02:52 AM2015-08-17T02:52:11+5:302015-08-17T02:52:11+5:30

ग्रामीण भागातील वीज भारनियमनाची समस्या अद्याप कायम आहे. याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर केला जात आहे.

Solar Energy Health Center | सौर ऊर्जेने सुधारली आरोग्य केंद्र

सौर ऊर्जेने सुधारली आरोग्य केंद्र

Next

नागपूर : ग्रामीण भागातील वीज भारनियमनाची समस्या अद्याप कायम आहे. याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर केला जात आहे. यामुळे जिल्ह्यातील कन्हान, कोंढाळी व मांंढळ आदी ठिकाणची आरोग्य सेवा सुधारली आहे.
३० हजार लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र असायला हवे. परंतु कन्हान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर १६ गावांतील ६० हजार लोकसंख्येचा भार आहे. तसेच या भागातील कोळसा खाणीत काम करणाऱ्या मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. असे असतानाही जिल्ह्यात या प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्षाला सर्वाधिक २५० प्रसूतीच्या केसेस आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गजभिये यांनी दिली. सौर ऊर्जेची सुविधा झाल्याने विजेची समस्या मिटली. हे रग्णालय राष्ट्रीय महामार्गावर असल्याने अपघाताच्या रुग्णांची संख्या मोठी असते. वैध गर्भपाताच्या केसेस मोठ्या प्रमाणात असतात. या भागातील लोकांना शुद्धिकरणाची प्रक्रिया केलेले पाणी मिळत नसल्याने साथरोगाच्या रुग्णांची संख्या अधिक असते. रुग्णांची संख्या विचारात घेता आणखी दोन डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
ट्रामा सेंटरचा प्रस्ताव प्रलंबित
राष्ट्रीय महामार्गावरील मनसर प्राथमिक आरोग्य केंद्राशी २२ गावे जोडण्यात आली आहेत. या गावातील लोकसंख्या ३२ हजार आहे. त्यातच या भागात कोळसा खाणी असल्याने मोठ्या प्रमाणात कामगार उपचारासाठी येतात. खाणीमुळे क्षयरोगाचे रुग्ण अधिक आहेत. येथे सिकलसेलचे १३ रुग्ण उपचार घेत असून आदिवासी गावातील कुपोषित बालकांवर उपचार करून त्यांना पोषक आहार दिला जातो. रुग्णांची संख्या विचारात घेता येथे सौर ऊर्जा प्रकल्पाची गरज आहे. औषधसाठा पुरेसा आहे. परंतु अपघाताच्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने येथे ट्रामा सेंटर उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. परंतु हा प्रस्ताव प्रलंबित आहे. तसेच येथे औषधी भांडार व कार्यालयासाठी दोन खोल्यांची गरज असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी उत्तम चौधरी यांनी दिली. कृषी सभापती आशा गायकवाड यांनी या केंद्राचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.
रुग्णालयाच्या जागेवर अतिक्रमण
कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. परंतु रुग्णालयाच्या बाजूच्या जागेवर अतिक्रमण असल्याने रुग्णालयाचा विस्तार थांबला आहे. तसेच सुरक्षा भिंत नसल्याने असामाजिक तत्त्वाचा वावर असतो. तसेच मोकाट गुरांचा वावर असतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांत असुरक्षिततेची भावना असते. परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे अतिक्रमण काढण्याची कारवाई होत नसल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागतो.

Web Title: Solar Energy Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.