सोलर इंडस्ट्रीज स्फोट प्रकरण: अखेर नागपुरात 'त्या' दुर्दैवी कामगारांवर झाले अंत्यसंस्कार

By योगेश पांडे | Published: December 22, 2023 12:16 AM2023-12-22T00:16:23+5:302023-12-22T00:16:33+5:30

अंतिम दर्शन न झाल्याने जिवलगांच्या मनाची घालमेल

Solar Industries blast case: 'Those' unfortunate workers finally cremated in Nagpur | सोलर इंडस्ट्रीज स्फोट प्रकरण: अखेर नागपुरात 'त्या' दुर्दैवी कामगारांवर झाले अंत्यसंस्कार

सोलर इंडस्ट्रीज स्फोट प्रकरण: अखेर नागपुरात 'त्या' दुर्दैवी कामगारांवर झाले अंत्यसंस्कार

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: सोलर इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या ९ कामगारांवर अखेर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. डीएनए चाचणीवरून मृतदेहांची ओळख पटविण्यात आली होती. त्यानंतरच अंत्यसंस्कार करण्यात आले. अखेरच्या क्षणी आपल्या जिवलगाचा चेहरादेखील पाहता न आल्यामुळे नातेवाईकांचा आक्रोश ह्रद्य पिळवटून टाकणारा होता. शहरातील मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रविवारी सोलर इंडस्ट्रीजमध्ये सीपीसीएच-१ मध्ये स्फोट झाल्याने ९ कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यात युवराज किसनाजी चारोडे- (बाजारगाव), ओमेश्वर किसनलाल मछिर्के ( चाकडोह- जि.नागपूर), मिता प्रमोद उईके (अंबाडा सोनक ता. काटोल, जि. नागपूर),- आरती नीळकंठ सहारे (कामठी मासोद, जि. नागपूर), श्वेताली दामोदर मारबते (कन्नमवार जि. वर्धा), पुष्पा श्रीराम मानापुरे ( शिराला जि. अमरावती), भाग्यश्री सुधाकर लोनारे (भुज तुकूम, ब्रम्हपुरी), रुमीता विलास उईके (ढगा जि. वर्धा), मोसम राजकुमार पटले (पाचगाव जि.भंडारा) यांचा समावेश होता. स्फोटाची तीव्रता अतिशय जास्त असल्याने त्यांच्या मृतदेहांच्या अक्षरश: चिंधड्या झाल्या होत्या. शरीराच्या विविध भागांची डीएनए चाचणी करण्यात आली व त्यानंतर त्यांची ओळख पटविण्यात आली. डीएनए चाचणीचा अहवाल प्राप्त होताच संबंधित भाग नातेवाईकांना सोपविण्यात आल्या. सर्वांचे अंत्यसंस्कार शहरातच करण्याची विनंती प्रशासनाकडून करण्यात आली. नातेवाईकांनीदेखील त्याला होकार दिला. त्यानुसार मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले. एकाच्या पार्थिवावर दफनविधी तर आठ पार्थिवाला अग्नी देण्यात आला. मृतांच्या नातेवाईकांना आणण्यासाठी व गावाला पाेहाेचवून देण्यासाठी प्रशासनाने वाहनांची व्यवस्था केली हाेती. सर्वांवर स्वतंत्रपणे त्याच्या रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले, अशी माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.

दुपारपासून सुरू झाली अंत्यसंस्काराची प्रक्रिया

दुपारी अडीच वाजल्यापासून अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू झाली. रात्री नऊ वाजेपर्यंत अंत्यसंस्कार चालले. सर्वच कामगारांचे नातेवाईक गावांतून नागपुरात पोहोचले होते. ज्याला आयुष्यभर सोबत पाहिले त्याच्या चेहऱ्याचे अंतिम दर्शनदेखील न झाल्याचे शल्य सर्वांच्याच आक्रोशातून उमटत होते.

Web Title: Solar Industries blast case: 'Those' unfortunate workers finally cremated in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.