सौरऊर्जेला मनपाचा रेड सिग्नल
By admin | Published: May 25, 2016 02:33 AM2016-05-25T02:33:21+5:302016-05-25T02:33:21+5:30
विजेची बचत व्हावी यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात सौरऊर्जेचा वापर करण्यावर भर द्यायला हवा, असा संदेश शासनाकडून देण्यात येतो.
नागपूर : विजेची बचत व्हावी यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात सौरऊर्जेचा वापर करण्यावर भर द्यायला हवा, असा संदेश शासनाकडून देण्यात येतो. परंतु नागपूर महानगरपालिकेने मात्र याला फारसे गंभीरतेने घेतलेले नाही. १४९ सिग्नल असलेल्या शहरात केवळ ५ सिग्नलच सौरऊर्जेवर चालत आहेत. यातूनच मनपाचा सौरऊर्जेबाबतची उदासीनता दिसून येत आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर शहरातील सिग्नलसंदर्भात माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. शहरात किती सिग्नल आहेत, यातील सौरऊर्जेवर तसेच ‘एलईडी’ लाईट असलेले किती सिग्नल चालतात, सिग्नलसाठी खर्च किती झाला इत्यादीबद्दल त्यांनी प्रश्न विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार शहरात सौरऊर्जेवर केवळ पाचच सिग्नल चालतात. यात वनिता विकास चौक, भरतनगर चौक, पत्रकार कॉलनी चौक, कामगार नगर चौक व नवीन काटोल नाका चौक यांचा समावेश आहे. यातील काही सिग्नल तर बरेचदा बंदच असतात. अशा स्थितीत ऊर्जाबचतीचा संकल्प केवळ कागदावरच राहणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, १ जानेवारी २०१२ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत शहरामध्ये १० नवीन सिग्नल लावण्यात आले. यासाठी ६० लाख ६६ हजार ३१३ रुपयांचा खर्च आला. म्हणजेच प्रत्येक सिग्नलसाठी सरासरी ६ लाख ६ हजार ६३१ रुपये खर्च झाले. यातील मेयो हॉस्पिटल चौक, टी.बी.वॉर्ड, आनंद टॉकीज, विजय टॉकीज येथील सिग्नल तर नेहमीच बंद राहतात. जर सिग्नल बंदच ठेवायचे होते तर इतका खर्च तरी का केला असादेखील प्रश्न उपस्थित होत आहे. या कालावधीत ‘जीएलएस’ असलेले १० सिग्नल खराब झाले. यांच्या दुरुस्तीसाठी तब्बल ३९ लाख ५६ हजार १८८ रुपये खर्च झाले. (प्रतिनिधी)
१३ सिग्नल ‘आॅफ’
नागपुरात एकूण १४९ वाहतूक सिग्नल आहेत. यातील १३ सिग्नल नादुरुस्त असून, १३६ सिग्नल चालण्याजोगे आहेत. १ जानेवारी २०१२ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत नवीन सिग्नल लावणे किंवा नादुरुस्त सिग्नल बसविणे यासाठी मनपातर्फे १ कोटी २२ हजार ५०१ रुपयांचा खर्च करण्यात आला.