Solar Storm: सूर्यामधून निघताना दिसले अधिक शक्तिशाली ज्वाळांचे वादळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 09:00 AM2021-11-01T09:00:21+5:302021-11-01T09:00:44+5:30
मानव वा पृथ्वीवर नाही; पण उपग्रहांवर परिणामांची शक्यता. सूर्याच्या हवामानाचा सातत्याने मागाेवा घेणाऱ्या ‘नासा’च्या ‘सोलर डायनॅमिक्स ऑर्बिटर’ने घेतलेला व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.
- निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सूर्य हा प्रचंड ऊर्जा निर्माण हाेणारा तारा आहे. गॅस व प्लाझ्मा असलेल्या ताऱ्यात हायड्राेजन व हेलियमच्या संयाेगाने प्रचंड अग्नी ज्वाळा निर्माण हाेऊन प्रकाश आणि उष्णता तयार हाेते, ही बाब सर्वश्रुत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत वेगळेच दृश्य अंतराळ संशाेधकांना दिसले आहे. सूर्याच्या गर्भात अग्नी ज्वाळांची तीव्रता वाढल्याचे व ज्वाळांचे वादळ बाहेर निघत असल्याचे संशाेधकांना आढळून आले. त्यामुळे वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.
सूर्याच्या हवामानाचा सातत्याने मागाेवा घेणाऱ्या ‘नासा’च्या ‘सोलर डायनॅमिक्स ऑर्बिटर’ने घेतलेला व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. सूर्याच्या आवरणात २५ ते २८ ऑक्टाेबरदरम्यान साैर ज्वाळांचे नेत्रदीपक दृश्य कैद करण्यात आले आहे. सूर्यामधून बाहेर पडणाऱ्या ज्वाळा (साैर फ्लेअर्स) एक्स-१ वर्गाच्या वादळाप्रमाणे हाेत्या. या दृश्याची सुरुवात साेमवारी झाली. सूर्याच्या डाव्या बाजूला सक्रिय साैर स्फाेटांची मालिका सुरू झाली. त्यानंतर लहान ज्वाळा व पाकळ्यांसारख्या विस्फाेटांची मालिका दिसून आली.
त्या नेहमीपेक्षा अधिक तेजस्वी आणि तीव्र हाेत्या.
उत्तर-दक्षिण पाेलवर दिसेल डान्सिंग लाइट
गुरुवारी सौर पदार्थाचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला व ज्वलंत किरणोत्सर्गाचे वादळ बाहेर पडले. याला ‘कोरोनल मास इजेक्शन’ म्हणतात. हे चार्ज झालेले सौर कण २.५ दशलक्ष मैल प्रति तास (४ दशलक्ष किमी प्रति तास) पेक्षा जास्त वेगाने बाहेर पडले.
ते कण रविवारपर्यंत पृथ्वीवर पोहोचतील, असा अंदाज हाेता. हे कण पृथ्वीच्या वातावरणाशी संवाद साधल्यानंतर नृत्य करणाऱ्या प्रकाशाप्रमाणे दृश्य दिसते ज्याला ‘ऑराेरा’ असे म्हटले जाते. हे दृश्य उत्तर व दक्षिण अक्षांशावर असलेल्या देशातील नागरिकांना अनुभवायला मिळेल.
गुरुवारी हे स्फाेट सूर्याच्या खालच्या मध्यभागी हाेत असल्याचे दिसून आले. ते थेट पृथ्वीकडे ताेंड करून हाेत असल्याचे वर्णन नासाच्या संशाेधकांनी केले आहे. रेडिएशनच्या प्रचंड उत्सर्जनामुळे या ज्वाळा निर्माण झाल्या असून, त्यातून निर्माण हाेणारे पार्टिकल बाहेर फेकले जात हाेते.
सूर्यावर साैर वादळे निर्माण हाेणे ही नेहमीची बाब आहे; पण हे वादळ अधिक शक्तिशाली आहे. मात्र, या ज्वाळांमधून निघणारे हानिकारक किरणाेत्सर्ग पृथ्वीच्या वातावरणातून जाऊ शकत नाही. त्यामुळे जमिनीवरील मानव किंवा सजीव सृष्टीवर त्याचे काहीही परिणाम हाेणार नाहीत. मात्र, पृथ्वीच्या चुंबकीय कक्षेबाहेर असलेल्या उपग्रह, जीपीएस किंवा संप्रेषण सिग्नलवर ते परिणाम करू
शकतात.
- महेंद्र वाघ, अंतराळ शिक्षक,
रमण विज्ञान केंद्र