नागपूर जिल्ह्यात १२० फुटखाली पाणी गेलेल्या बोरवेलला जोडणार सौरपंप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 09:42 PM2018-04-20T21:42:54+5:302018-04-20T21:43:06+5:30
जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १६०० बोअरवेलला मंजुरी दिली आहे. परंतु काही भागात पाण्याची पातळी अतिशय खाली गेल्याने बोअरवेलचा उपयोग होत नाही. परंतु आता या बोअरवेलसुद्धा ग्रामीण भागात उपयोगी पडणार आहे. १२० फुटाखाली पाणी गेलेल्या बोअरवेलवर सौरपंप जोडून ग्रामीण भागातील पाणी टंचाई दूर करण्याचा जि.प. चा प्रयत्न आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १६०० बोअरवेलला मंजुरी दिली आहे. परंतु काही भागात पाण्याची पातळी अतिशय खाली गेल्याने बोअरवेलचा उपयोग होत नाही. परंतु आता या बोअरवेलसुद्धा ग्रामीण भागात उपयोगी पडणार आहे. १२० फुटाखाली पाणी गेलेल्या बोअरवेलवर सौरपंप जोडून ग्रामीण भागातील पाणी टंचाई दूर करण्याचा जि.प. चा प्रयत्न आहे.
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस कोसळल्याने जिल्ह्यातील अनेक भागात भीषण पाणी टंचाईचे चटके ग्रामीणांना सोसावे लागताहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेने कामे हाती घेतले आहे. परंतु, १२० फुटाखाली पाणी गेल्यानंतर त्याचा वापर होत नाही. त्याच पाण्याचा वापर करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागातील अभियंता नीलेश मानकर यांनी अभिनव योजना तयार केली आहे. २००० लीटरची टाकी उभारून त्यात अर्धा एचपीचा सौरपंप जोडला जाईल. त्या टाकीतील पाण्याचा वापर नागरिकांना करता येईल.
ग्रामीण भागात पाणी टंचाई निवारण्यासाठी बोअरवेल्स उभारून हॅण्डपंप लावला जातो. मात्र १२० फुटापर्यंत पाणी वरती ओढता येते. त्यामुळे त्याखालील पाण्याचा वापर साधारणत: होत नाही. ते पाणी वापराकरिता आणण्यासाठीच ही योजना आहे. त्या ठिकाणाहून गरजेनुसार नागरिक पाणी वापरतील. सौरपंपामुळे नागरिकांचा त्रास कमी होईल. विशेष म्हणजे शासनाला नव्याने बोअरवेल उभारण्याची गरजच भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांना पाठविणार प्रस्ताव
जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापनची बैठक जि.प.अध्यक्षा निशा सावकर यांच्या अध्यक्षतेत बुधवारी पार पडली. याप्रसंगी मानकर यांनी या योजनेची माहिती सदस्यांना दिली. याबाबतचा प्रस्ताव तयार करून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविला जाणार असून एक प्रात्याक्षिकही दाखविले जाईल. तसेच पाणी टंचाई भाग-१ अंतर्गत ४८२ विंधन विहिरीचा आराखडा मंजुरीकरिता जिल्हाधिकाºयांना पाठविला. १६७९ हॅण्डपंपपैकी लोकसंख्येनिहाय १०८८ हॅण्डपंपाकरिता स्थळ निश्चित केले आहे. त्यापैकी २१७ हॅण्डपंपची कामे पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. बैठकीला उपाध्यक्ष शरद डोणेकर, विषय सभापती उकेश चव्हाण, सभापती पुष्पा वाघाडे, सभापती दीपक गेडाम, सदस्य जयप्रकाश वर्मा, डॉ. शिवाजी सोनसरे, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार उपस्थित होते.