दिवसभर फुगे विकले, रात्री चाकूने भोसकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 01:01 AM2020-05-17T01:01:30+5:302020-05-17T01:04:23+5:30
दिवसभर उन्हातानात फुगे विकणाऱ्यांचा रात्री पैशाच्या वाटणीतून वाद झाला. त्यामुळे एकाने चाकू काढून दुसºयाच्या पोटात भोसकला. शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शंकरनगर चौकात ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवसभर उन्हातानात फुगे विकणाऱ्यांचा रात्री पैशाच्या वाटणीतून वाद झाला. त्यामुळे एकाने चाकू काढून दुसºयाच्या पोटात भोसकला.
शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शंकरनगर चौकात ही घटना घडली.
बिरू भगवान पुरी (वय २०) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील मंडला गावचा रहिवासी आहे. तो आणि त्याच्या सोबतचे गावातील काही लोक नागपुरात कस्तुरचंद पार्कजवळ फुटपाथवर राहतात. दिवसभर वेगवेगळ्या भागात जाऊन ते फुगे विकतात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी ते हिंगणा परिसरात गेले होते. तिकडे फुगे विक्रीतून आलेल्या पैशातून त्यांनी अंबाझरी तलावाजवळ दारू पिली. त्यानंतर ते शंकरनगर बसथांब्याजवळ आले. तेथे फुगे विक्रीच्या पैशाची वाटणी करत असताना आरोपी खोका आणि बिरू पुरी या दोघांचा वाद झाला. तो विकोपाला गेल्यानंतर आरोपी खोकाने बिरूच्या पोटात चाकू खुपसला. यामुळे बिरू गंभीर जखमी झाला. त्यांच्या सोबत असलेल्या बच्चा बब्बू मोघिया याने कसाबसा वाद सोडवून नागरिकांना गोळा केले. नंतर बजाजनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली खोकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.