भीषण अपघातात सैनिकाचा मृत्यू, सात सैनिकांसह ऑटाेचालक गंभीर जखमी
By सुमेध वाघमार | Published: June 16, 2024 08:28 PM2024-06-16T20:28:47+5:302024-06-16T20:29:13+5:30
ट्रॅव्हल्सची ऑटाेला जाेरदार धडक : कन्हान नदीच्या पुलावरील घटना
नागपूर: कन्हान (ता. पारशिवनी) शहरातून साहित्य खरेदी केल्यानंतर कामठी शहरात येत असलेल्या सैनिकांच्या ऑटाेला विरुद्ध दिशेने वेगात जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने जाेरात धडक दिली. यात एका सैनिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर सात सैनिक आणि ऑटाेचालक असे आठ जण गंभीर जखमी झाले. ही घटना कामठी (जुनी) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील कन्हान नदीच्या पुलावर रविवारी (दि. १६) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
विघ्नेश असे मृत सैनिकाचे नाव आहे. कामठी शहरातील सैनिक प्रशिक्षण केंद्रातील काही सैनिक साहित्य खरेदी करण्यासाठी कन्हानला गेले हाेते. खरेदी आटाेपल्यानंतर त्यांनी दाेन ऑटाेने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. एमएच-४९/एआर-७४३३ क्रमांकाचा ऑटाे कन्हान नदीच्या पुलावर पाेहाेचताच नागपूरहून शिवनी (मध्य प्रदेश) येथे वेगात जाणाऱ्या एमएच-३१/एफसी-४१५७ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने ऑटाेला जाेरात धडक दिली.
यात ऑटाेतील आठ सैनिकांसह चालक गंभीर जखमी झाला. मागून दुसऱ्या ऑटाेने येत असलेल्या सैनिकांनी सर्व जखमींना लगेच कामठी सैनिक प्रशिक्षण केंद्राच्या हाॅस्पिटलमध्ये नेले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर पाच सैनिकांसह ऑटाे चालकास नागपूर शहरातील मेयाे रुग्णालयात हलविण्यात आले तर तिघांना कामठी शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती केले.
मेयाे रुग्णालयात एका सैनिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर तिघांना नागपुरातील मेडिकल हाॅस्पिटलच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये भरती करण्यात आले. या तिघांच्या डाेक्याला गंभीर दुखापत असल्याच माहिती डाॅक्टरांनी दिली. याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.