सोनेगावात निवृत्त अधिकाऱ्याकडे दरोडा
By admin | Published: August 30, 2015 02:32 AM2015-08-30T02:32:22+5:302015-08-30T02:32:22+5:30
सेवानिवृत्त अधिकारी आणि त्याच्या परिवारातील सदस्यांना गंभीर जखमी केल्यानंतर तब्बल सव्वातीन तास ओलिस ठेवणाऱ्या दरोडेखोरांनी त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम,...
नागपूर : सेवानिवृत्त अधिकारी आणि त्याच्या परिवारातील सदस्यांना गंभीर जखमी केल्यानंतर तब्बल सव्वातीन तास ओलिस ठेवणाऱ्या दरोडेखोरांनी त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, दागिने आणि अन्य मौल्यवान चिजवस्तूंसह दोन लाखांचा ऐवज लुटून नेला. शनिवारी पहाटे उघडकीस आलेल्या या घटनेमुळे सर्वत्र प्रचंड खळबळ निर्माण झाली. वृत्त लिहिस्तोवर कोणताही आरोपी ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले नव्हते.
ओलिस ठेवून गंभीर जखमी करून दरोडेखोराच्या निर्दयतेला बळी पडून जबर जखमी झालेल्यांमध्ये बाळकृष्ण मोगरे (वय ६५) त्यांची पत्नी आणि मुलीचा समावेश आहे.
मोगरे केंद्रीय आरोग्य विभागाचे निवृत्त अधिकारी असून, त्यांच्या पत्नी लता यासुद्धा निवृत्त शिक्षिका आहेत. नेहमीप्रमाणे मोगरे परिवार पावनभूमी (सोनेगाव) परिसरातील त्यांच्या ‘पितृसुगंध’ या निवासस्थानी झोपले होते. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर (१.३० च्या सुमारास) किचनच्या खिडकीचे गज कापून एक्झास्ट फॅन काढल्यानंतर पाच ते सहा दरोडेखोर मोगरे यांच्या निवासस्थानात आले. मोगरे यावेळी किचन लगतच्या शयनकक्षात झोपून होते. त्यांच्या बाजूच्या रूममध्ये पत्नी लता आणि मुलगी मयूरी झोपल्या होत्या. पाऊस सुरू असल्यामुळे दरोडेखोर घरात शिरल्याचे मोगरे कुटुंबीयांना कळलेही नाही. प्रारंभीच दरोडेखोरांनी मोगरेंच्या तोंडावर कापड बांधून त्यांचे हातपाय बांधले. आरडाओरड करताच जीवे मारण्याची धमकी देऊन गप्प केले.
दरोडेखोरांनी मारला चाकू
नागपूर : मोगरेंचा आवाज ऐकून पत्नी लता आणि मुलगी मयूरी धावत आल्या. त्या ओरडत असल्याचे पाहून दरोडेखोरांनी त्यांना चाकूने मारून जबर दुखापत केली. त्यांचे हातपाय बांधून त्यांना एका खोलीत डांबण्यात आले. त्यानंतर बाजूच्या खोलीतील तक्षू नामक मुलीला चाकू, तलवारचा धाक दाखवून गप्प करीत दरोडेखोरांनी पुढचे सव्वातीन तास मोगरेंच्या निवासस्थानात अक्षरश: हैदोस घातला. पहाटे ४.४५ पर्यंत घरातील कानाकोपरा हुडकून दरोडेखोरांनी रोख २० हजार, मंगळसूत्रासह आणखी काही दागिने, लॅपटॉप, मोबाईल असा एकूण १ लाख, ९० हजारांचा ऐवज घेऊन पळ काढला. (प्रतिनिधी)
शेजाऱ्यांनी केली सुटका
दरोडेखोर बाहेरचे दार बंद करण्यासोबतच ओरडल्यास आम्ही येथेच आहोत असे सांगून गेले होते. त्यामुळेही मदतीसाठी ओरडण्याची मोगरे कुटुंबीयांची हिंमत झाली नाही. दरम्यान, सकाळच्या वेळी शेजारी मोगरेंच्या आवारातील फुलं तोडायला आली. खिडकीतून त्यांचा आवाज आल्यामुळे जखमी मोगरेंनी त्यांना मदतीची याचना केली. त्यानंतर शेजारी गोळा झाले. मोगरे कुटुंबीयांना त्यांनी धीर देत पोलिसांना कळविले. त्यानंतर सोनेगावचे पोलीस पथक घटनास्थळी पोहचले. जखमी मोगरे कुटुंबीयांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी मानसिक धक्क्यातून ते अजून सावरलेले नाही. सोनेगाव पोलिसांनी या प्रकरणी दरोड्यासह हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.