सौदी अरबमधील मानवी तस्करीचा तपास एका शिपायाकडे

By admin | Published: May 5, 2017 02:45 AM2017-05-05T02:45:48+5:302017-05-05T02:45:48+5:30

नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेला दोन लाख रुपयात सौदी अरबमध्ये विकण्यात आले होते.

A soldier in Saudi Arabia investigates human trafficking | सौदी अरबमधील मानवी तस्करीचा तपास एका शिपायाकडे

सौदी अरबमधील मानवी तस्करीचा तपास एका शिपायाकडे

Next

सक्करदरा पोलिसांचा कारनामा : लोकमतच्या वृत्ताने खळबळ
नागपूर : नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेला दोन लाख रुपयात सौदी अरबमध्ये विकण्यात आले होते. मानवी तस्करीच्या या प्रकरणाला पोलिसांनी गांभीर्याने न घेता त्याचा तपास एका शिपायाकडे सोपवला. लोकमतने गुरुवारी हे प्रकरण उघडकीस आणताच पोलिसांना जाग आली. गुरुवारी सकाळी सक्करदरा पोलीस महिलेच्या घरी पोहोचले. तब्बल साडेतीन महिन्यानंतर पोलिसांना अचानक आपल्या घरी पाहून महिलेलाही आश्चर्य वाटले. पोलिसांच्या एकूणच भूमिकेमुळे दु:खी असलेल्या महिलेनेही त्यांना कुठलाही प्रतिसाद दिला नाही.
ताजाबाद येथील रहिवासी असलेल्या ४० वर्षीय महिलेला बोरगाव येथील अकीला बेगम नावाच्या महिलेने सौदी अरबमध्ये २० हजार रुपये महिन्याची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसविले होते. अकीलाने मुंबईतील अब्दुल्लाह नावाच्या दलालाच्या मदतीने पीडित महिलेला ९ सप्टेंबर २०१६ रोजी सौदी अरबला पाठविले होते. तिथे दुबईवरून रियाद मार्गे ती हाईल या शहरात गेली. हाईल येथे आसमा नावाच्या महिलेच्या घरी ती काम करीत होती. एक महिना काम केल्यानंतर तिने वेतन मागितले असता तिला मारहाण करण्यात आली होती. यानंतर आसमाचे भाऊ खालिद आणि हमद हे नेहमीच पीडित महिलेला मारहाण करायचे. तिला जेवण सुद्धा दिले जात नव्हते. पीडित महिलेला अब्दुल्लाहकडून दोन लाख रुपयात विकत घेतल्याचे ते म्हणायचे.
एक दिवस खालिदने पीडित महिलेशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याने ती पळून गेली होती. परंतु दुबई पोलिसांना गुंगारा देऊन तिला पुन्हा घरी आणण्यात आले होते. दुसऱ्यांदा जेव्हा ती पळाली तेव्हा दुबई पोलिसांनी तिला तुरुंगात पाठविले. तेव्हा भारतीय दूतावासाकडून तिला मदत मिळाली. ती दुबईवरून हैदराबाद मार्गे नागपूरला पोहोचली. नागपुरात येताच तिने १२ जानेवारी रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. तिच्याप्रमाणेच इतर अनेक महिलांनाही सौदी अरबमध्ये विकण्यात आल्याचा प्रकार या प्रकरणाचा तपास केल्यास उघडकीस येऊ शकतो. मानवी तस्करीचे हे आंतरराष्ट्रीय प्रकरण असल्याने याच्या तपासासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करायला हवी होती. सक्करदरा पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतलेच नाही. केवळ एका शिपायाकडे या प्रकरणाचा तपास सोपविला. पोलिसांनी आतापर्यंत केवळ पीडित महिलेचेच बयाण नोंदविले आहे. यापुढे तपास करण्यास पोलिसांनीही पुढाकार घेतला नाही.
गुरुवारी लोकमतने या प्रकरणावर वृत्त प्रकाशित केले. तेव्हा सक्करदरा पोलीस पीडित महिलेच्या घरी गेले. तिला तपास करीत असल्याचे सांगत मदत करण्यास सहकार्य करण्याची विनंती केली. पीडित महिलेने यापूर्वी पोलीस ठाण्याच्या अनेक चकरा मारल्या. साडेतीन महिन्यापर्यंत पोलिसांनी कुठलीही ठोस कारवाई का केली नाही, असा प्रश्न तिने उपस्थित केला असता पोलीस उत्तर देऊ शकले नाहीत. (प्रतिनिधी)


गुन्हे शाखेद्वारा व्हावी चौकशी
मानवी तस्करीत आंतरराष्ट्रीय टोळी सामील असल्याने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी पुढे आली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे, निर्भया बेटी सुरक्षा अभियानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गुरव, सचिव सविता पांडे, सुनिता ठाकरे आदींनी साडेतीन महिन्यापर्यंत पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवर कुठलीही कारवाई का केली नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. पीडित महिला मदतीसाठी पोलिसांकडे वारंवार गेली. परंतु पोलिसांनी काहीही केले नाही. मीडियाने प्रकरण उघडकीस आणले तेव्हा पोलीस तिच्या घरापर्यंत गेले. त्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणात न्याय मिळण्याची शक्यता नाही. तेव्हा या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

Web Title: A soldier in Saudi Arabia investigates human trafficking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.