नागपुरातील सीताबर्डी किल्ल्यासाठी सैनिकांचा लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 10:37 AM2019-11-26T10:37:08+5:302019-11-26T10:39:16+5:30
भारतीय सेनेचे उत्तर महाराष्ट्र व गुजरात युनिट (उमंग) हे मुंबईचे कार्यालय काही काळासाठी नागपुरात हलविण्यात आले. उमंगच्या अधिकाऱ्यांनी सेना मुख्यालय दिल्ली येथे शिफारस करून ८० वर्षांपासून वसलेल्या ११८ प्रादेशिक सेनेला येथून बेदखल करून भुसावळला पाठविले.
मंगेश व्यवहारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय सेनेच्या ११८ प्रादेशिक सेनेचे मुख्यालय हे सीताबर्डी किल्ला होते. ११८ इन्फन्ट्री बटालियनला विदर्भाची हक्काची सेना म्हटले जायचे. कर्नल, लेफ्ट. कर्नल, दोन मेजर यांच्या नेतृत्वात ५११ जवानांची कंपनी येथे तैनात असायची. पण सेनेचेच उत्तर महाराष्ट्र व गुजरात युनिट (उमंग) हे मुंबईचे कार्यालय काही काळासाठी नागपुरात हलविण्यात आले. उमंगच्या अधिकाऱ्यांना किल्ल्यावरील अधिवासाची भुरळ पडली. त्यांनी सेना मुख्यालय दिल्ली येथे शिफारस करून ८० वर्षांपासून वसलेल्या ११८ प्रादेशिक सेनेला येथून बेदखल करून भुसावळला पाठविले. मुख्यालयाच्या या निर्णयामुळे ११८ च्या जवानांनी नाराजी व्यक्त केली. माजी सैनिकांनी तर किल्ल्यासाठी भारतीय सेनेसोबतच संविधानाच्या मार्गाने लढाई सुरू केली आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी १९३९ मध्ये प्रादेशिक सेना स्थापन केली. या सेनेला इंग्रजांनी ताब्यात घेतलेला सीताबर्डीचा किल्ला सोपविला. स्वातंत्र्यानंतर प्रादेशिक सेना कायदा १९४८ निर्माण झाला. तेव्हापासून ११८ प्रादेशिक सेना किल्ल्यावर तैनात होती. विदर्भाच्या हक्काची ही सेना मानली जाते. विदर्भातील युवकांना प्रोत्साहन आणि सेनेत भरती होण्याची संधी मिळत होती. उपराजधानीच्या हृदयस्थळावर सेनेचे हे केंद्र होते. ११८ च्या माजी सैनिकांनी या उजाडलेल्या टेकडीवर नंदनवन खुलविले होते. त्यामुळे माजी सैनिकांचीही प्रचंड आत्मियता आहे. आपात्कालीन स्थितीत आणि सीमेवरील लढाईतसुद्धा या सेनेच्या जवानांनी शौर्य गाजविले. याच किल्ल्यावर महात्मा गांधींना इंग्रजांनी डांबून ठेवले होते. त्यांची कोठडीसुद्धा येथे आहे.
सेनेच्याच उमंग युनिटला नागपुरात हलविण्यात आले. रिझर्व्ह बँकेच्या मागील सीडब्ल्यूई कार्यालयात त्यांना जागा दिली. उमंग युनिट हे सेनेचे थिंक टँक मानले जाते. मेजर जनरल रँकच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात २२ अधिकाºयांसह ५० ते ५५ जवानांचा स्टाफ कार्य करतो. उमंग युनिटच्या अधिकाºयांना किल्ल्याच्या परिसराची भुरळ पडली. त्यांनी सेनेच्या मुख्यालयाकडे किल्ला ताब्यात देण्याची शिफारस केली. मुख्यालयाने ११८ प्रादेशिक सेनेला आपले घर सोडण्याचे फर्मान सोडले. त्यामुळे अख्ख्या बटालियनने मुख्यालय सोडले.
मुख्यालयाने दिलेल्या निर्णयामुळे तैनात सैनिकांनी नाराजी व्यक्त केली. पण सेनेचा आदेश अंतिम असल्याने त्यांना अधिवास सोडावा लागला. मात्र ही बाब माजी सैनिकांना खटकली. त्यांनी सनदशीर मार्गाने किल्ल्यासाठी लढाई सुरू केली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, चीफ आॅफ आर्मी स्टाफ यांना पत्र पाठवून मनधरणी केली. उच्च न्यायालयातसुद्धा याचिका दाखल केली. पण त्यांचे समाधान झाले नाही.
५५ सैनिकांसाठी ९९ एकरचा परिसर
सीताबर्डी किल्ल्याचा परिसर हा ९९ एकरचा होता. ११८ प्रादेशिक सेनेच्या ५११ जवानांची कंपनी येथे तैनात असायची. आता किल्ल्याचा ताबा उमंग युनिटने घेतला आहे. त्यांचा अधिकाºयांसह जवानांचा ५५ लोकांचा स्टाफ आहे. ५५ लोकांनी ९९ एकरचा परिसर सांभाळणे अवघड आहे. माजी सैनिकांच्या मते, किल्ल्याची दुरवस्था होत आहे. वर्षातून दोन दिवस सामान्य नागरिकांसाठी किल्ला सुरू राहायचा. तोही लवकरच बंद होण्याच्या मार्गावर आहे.
भाडेकरू म्हणून आले आणि घरमालक बनले
उमंग युनिट येथे भाडेकरू म्हणून आले होते. त्यांना जागा आवडल्याने सेनाप्रमुखाकडे शिफारस करून घरमालक बनले. पण येथे तैनात असलेली प्रादेशिक सेना ही विदर्भाची अस्मिता आहे. प्रादेशिक सेनेच्या ८० वर्षांच्या अधिवासापासून दूर केले आहे. आमच्या हक्काचा किल्ला मिळविण्यासाठी आमचा प्रयत्न शेवटपर्यंत राहील. ही लढाई सैनिकांची सेनेसोबत आहे.
- राम कोरके, उपाध्यक्ष, माजी सैनिक आघाडी, भाजपा, महाराष्ट्र प्रदेश